एकाला न्याय; दुसऱ्यावर अन्याय
By Admin | Updated: September 28, 2016 00:38 IST2016-09-28T00:22:48+5:302016-09-28T00:38:57+5:30
औरंगाबाद : एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सर्वच संस्थांमधून आणि शासकीय स्तरावरून होताना दिसतो.

एकाला न्याय; दुसऱ्यावर अन्याय
औरंगाबाद : एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न सर्वच संस्थांमधून आणि शासकीय स्तरावरून होताना दिसतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसते. प्रशासन कसे काम करत आहे याचा गमतीशीर नमुना नुकताच प्रत्ययास आला आहे.
विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्रासाठी वर्ग घ्यायलाही जागा नाही, अशी परिस्थिती आहे. प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी अगदी दाटीवाटीने एकाच खोलीत बसतात. विभागाचे कार्यालयही त्याच एका रूममधून चालते. यासंदर्भात विभागप्रमुख डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. निर्मला जाधव व विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे वर्गखोल्यांसाठी जागा देण्याची मागणी केली. मात्र विद्यापीठ प्रशासनाने स्त्री अध्यासन केंद्राला एक खोली देताना ती मानव्य इमारतीतील सर्व मुलींसाठी असलेली ‘कॉमन रूम’ देऊन टाकली. यामुळे विद्यार्थिनींना आता ‘कॉमन रूम’ राहिलेली नाही. स्त्री अध्यासन केंद्राने दिलेल्या रूमचा नियमानुसार ताबा घेतला. त्यामुळे ‘कॉमन रूम’ मध्ये वावरणाऱ्या विद्यार्थिनी आता व्हरांड्यामध्ये फि रताना दिसतात किंवा प्रवेशद्वाराजवळील कट्ट्यावर बसलेल्या दिसत आहेत. ‘कॉमन रूम’ का काढण्यात आली याचे कारण विद्यार्थिनींनाही कळले नाही.
विद्यार्थिनींनी ‘कॉमन रूम’ काढल्याने आम्हालाही पेचात पडल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया स्त्री अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा अहिरे यांनी दिली. मुलींची रूम काढून दिली जावी, याचे आम्हालाही वाईट वाटत आहे, असे त्या म्हणाल्या.