शेतकऱ्यांना मदतीची नुसती घोषणा; अधिवेशन संपले की सत्ताधाऱ्यांना शोधावे लागेल: चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:50 IST2025-12-11T12:49:51+5:302025-12-11T12:50:30+5:30
चंद्रकांत खैरेंनी हिवाळी अधिवेशन आणि शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांना मदतीची नुसती घोषणा; अधिवेशन संपले की सत्ताधाऱ्यांना शोधावे लागेल: चंद्रकांत खैरे
छत्रपती संभाजीनगर: ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिंदेसेना आणि भाजप नेत्यांवर अत्यंत स्फोटक टीकास्त्र सोडले. खैरेंनी हिवाळी अधिवेशन आणि शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. "मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तुरळक पैसे मिळालेले आहेत, तोंड पुसण्यासारखे. तुम्ही घोषणा करता, मग द्या ना शेतकऱ्यांना ते पैसे. अधिवेशन संपले की या सत्ताधाऱ्यांना शोधावे लागणार आहे." मुख्यमंत्री सहायता निधी कोशाचा पैसा गेला कुठे? आम्ही अनेकवेळा चौकशीची मागणी केली आहे. तो पैसा जनतेच्या न्यायालयात आला पाहिजे, असे खैरे म्हणाले.
खैरे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरून त्यांना थेट इशारा दिला. "संजय गायकवाड यांनी गद्दारी केली आहे आणि आता ते शिंदे यांच्याकडे जाऊन बोलतात. मी त्याला म्हणतो, तू जास्त बोलू नकोस, हे तुला घातक आहे. तुझी लेव्हल काय आहे? मी त्याला समज देतो आहे." तसेच जयंत पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांना अजूनही एक नंबरवर येण्याची आशा आहे, पण ते आता शक्य नाही, असेही खैरे म्हणाले.
अब्दुल सत्तार म्हणजे 'हिरवा साप'!
खैरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अत्यंत कठोर टीका केली आणि गंभीर आरोप केले. "अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे. याने हिंदूंवरच नाही, तर मुस्लिमांच्या जमिनीही बळकावल्या आहेत." सत्तार आणि दानवे यांच्यातील जुन्या वादाचा उल्लेख करत, आता त्यांचे साटेलोटे आहे का? असा प्रश्नही खैरेंनी उपस्थित केला.
राणेंची लायकी आहे का?
नारायण राणे यांनी केलेल्या 'जिहादी' वक्तव्यावरून खैरेंनी त्यांना थेट लक्ष्य केले. "मला राणेंचे वक्तव्य खटकले, हा काहीही बोलतो. तुमचे वडील सोनिया गांधीचे पाय दाबत होते. बाळासाहेबामुळे तुमचे कुटुंब मोठे झाले, तुमची लायकी तरी आहे का? उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला."
निवडणूक आयोग 'बटीक' झाले
निवडणूक आयोगावर टीका करताना खैरे म्हणाले, "राज्य निवडणूक आयोगाबाबत आम्ही का बोलतो, कारण १५-१५ हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. राज ठाकरे एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तरीदेखील त्यांचे ऐकले नाही. याचा अर्थ निवडणूक आयोग बटीक झाले आहे."
शिंदेसेनेत धुसफूस
"चित्रलेखा यांनी व्हिडिओ काढला आहे. शिंदेंचे आमदार यांचे व्हिडिओ समोर येत आहेत. शिरसाट यांचा देखील व्हिडिओ समोर आला होता. हे काय चालले आहे?" असा सवाल खैरेंनी केला. तसेच 'लाडक्या बहिणींचा' निवडणुकीत गैरफायदा घेतल्याचा आरोप करत समाज कल्याण मंत्र्यांच्या खात्यात गोंधळ असल्याबद्दल संताप व्यक्त केला.