विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नऊ वर्षांत दोनशे विद्यार्थ्यांना ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:21 IST2018-12-11T18:17:16+5:302018-12-11T18:21:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने मागील दहा वर्षांपासून संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्याची यशस्वी परंपरा यावर्षीही राखली आहे.

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नऊ वर्षांत दोनशे विद्यार्थ्यांना ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने मागील दहा वर्षांपासून संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्याची यशस्वी परंपरा यावर्षीही राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सीएसआयआर- राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील ९ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील ज्युनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर झाली. मागील नऊ वर्षांत विभागाच्या २०० विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकवल्याची माहिती विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या सीएसआयआर नेट परीक्षेत विभागातील १३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यात आकाश वाघमारे, स्वाती दिलवाले, अमृता भगत, स्नेहा ठाकूर, गीता खराबे, बालाजी साळुंखे, अरुण कुटे, राधाकिसन खारगुडे, चंद्रकांत जाधव, मोहसील शेख, दीक्षा वाहूळ, सोनी जगदिवे आणि शंकर रेड्डी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना डॉ. गायकवाड यांच्यासह डॉ. अंजली राजभोज, डॉ. मच्छिंद्र लांडे, डॉ. सुनील शंकरवार, डॉ. गिरीबाला बोंदले, डॉ. बापूराव शिंगटे, डॉ. भास्कर साठे आणि प्रा. अनुसया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ‘नॅक’ची रंगीत तालीम झाल्यानंतर विभागातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.
नऊ वर्षांत २१४ विद्यार्थी उत्तीर्ण
२०१० पासून रसायनशास्त्र विभागातील तब्बल २१४ विद्यार्थी सीएसआयआर नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील २०० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त झाली. यावेळी राज्य पात्रता परीक्षेतही (सेट) उत्तीर्णतेचा मोठा आकडा आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देशभरातील कोणत्याही संशोधन संस्थेत संशोधनाची संधी विद्यार्थ्यांना मिळते, यात विभाग राज्यात आघाडीवर असल्याचेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचा डंका
रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये तब्बल १४५ शोधनिंबध प्रकाशित करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजविला आहे. यात विशेष म्हणजे ‘केमिकल रिव्हिव्यूज’ या नियतकालिकेत प्रकाशित झालेल्या डॉ. बापू शिंगटे यांच्या शोधनिंबधाचा ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ हा ५२.६१३ इतका आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये सर्वांधिक ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ असणारा हा शोधनिबंध असल्याचे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. सध्या १३ विद्यार्थी प्रतिमहिना २५ ते ३५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून विभागात संशोधन करीत आहेत. तसेच डीएसटी-फिस्टअंतर्गत १ कोटी आणि यूजीसी सॅपअंतर्गत १ कोटी ४० रुपयांचे प्रकल्प विभागात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षनिहाय नेट उत्तीर्णांची संख्या
२०१० -२६
२०११ -५२
२०१२ -३३
२०१३ -९
२०१४ -१५
२०१५ -१९
२०१६ -३४
२०१७ -१३
२०१८ -१३
यशात सातत्य...
विभागातील प्राध्यापकांची एकजूट, विद्यार्थ्यांप्रती असणारी भावना आणि अतिशय कडकपणे केली जाणारी अंमलबजावणी यामुळे यशात सातत्य टिकून आहे. विभागातील प्राध्यापक रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच एमएस्सीसाठीचा अभ्यासक्रमही अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे हे यश मिळत आहे.
- कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, विभागप्रमुख, रसायनशास्त्र