जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव

By सुमेध उघडे | Updated: July 29, 2021 19:56 IST2021-07-29T19:49:56+5:302021-07-29T19:56:01+5:30

Unseen Aurangabad Jogeshwari caves : आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा.

Jogeshwari: Neglected Caves near Aurangabad | जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव

जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव

ठळक मुद्दे वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर असलेली ही लेणी अत्यंत लक्षवेधी आहे. लेणी पर्यटक आणि लेणी अभ्यासकांना पर्वणीच आहे. 

जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ याशिवाय आणखीही प्राचीन लेण्या आहेत. केवळ योग्य माहिती नसल्याने पर्यटक या लेण्यांचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. यातीलच एक लेणी आहे जोगेश्वरी. जंगल, नदी, धबधबा आणि लेणी असा एकत्रित नजराणाच येथे तुमची वाट पाहत आहे. वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर असलेली ही लेणी अत्यंत लक्षवेधी आहे. येथे एकूण चार लेण्या आहेत. लेणीच्यावर उगमस्थान असलेली खाचखळग्यातून वाहणारी येळगंगा नदी येथील वातावरण अधिकच मनमोहक बनवते. असा हा आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा. 

कसे जाल - 
औरंगाबादपासून खुलताबाद २५ किमी आहे. खुलताबादपासून म्हैसमाळच्या रस्त्यावर गेल्यास काही अंतरावर डावीकडे जोगेश्वरी माता मंदिर अशी पाटी दिसेल. येथून एक ते दोन किमी आत गेल्यास एक वस्ती लागते. इथे रस्ता थांबतो आणि सुरु होते पाऊल वाट. गाड्या येथेच पार्क करून चालत पुढे गेल्यास काही अंतरावर दोन पाऊल वाट दिसतात. घनदाट झाडी आणि बारीक झुडपांच्या जंगलातून जाणाऱ्या दोन्ही वाटा लेण्याकडेच जातात. येथून दहा मिनिट चालत गेल्यास येळगंगा नदीचे मात्र नजरेस पडते. त्यापुढेच लेण्या आहेत. मुख्यतः पाऊल वाट आणि लेणी परिसरात खाचखळगे असल्याने जास्त पावसात येथे जाणे टाळा. 

काय पहाल - 
वेरूळ मधून वाहणाऱ्या येळगंगा नदीचा येथे उगम होतो. धबधब्याच्या रूपाने खाली येणारी ही नदी वाहत जोगेश्वरी लेण्याकडे येते. एका कोपऱ्यात दीप माळ दिसते, तर समोर विहिरीसारखी कुंड आहेत. एका लेणीत जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. दुसऱ्या लेणीत कोरलेले अस्पष्ट कैलास शिल्प आहे. तर आणखी दोन लेण्यात गर्भगृह आहेत. तिकडे जाण्याचा रस्ता खराब आहे. मात्र, दुरूनच लेणीवरील सुरेख कोरीव काम लक्षवेधून घेते.  ग्रामस्थांच्याशिवाय खूप कमी जणांना माहिती असलेली ही लेणी पर्यटक आणि लेणी अभ्यासकांना पर्वणीच आहे. 

Web Title: Jogeshwari: Neglected Caves near Aurangabad