नोकरीचे आमिष; साडेचार लाखांना गंडा
By Admin | Updated: May 6, 2016 23:59 IST2016-05-06T23:32:00+5:302016-05-06T23:59:56+5:30
औरंगाबाद : सैन्यात भरती करतो म्हणून दोन भामट्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला.

नोकरीचे आमिष; साडेचार लाखांना गंडा
औरंगाबाद : सैन्यात भरती करतो म्हणून दोन भामट्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला. हा प्रकार सिडको भागात घडला. विशेष म्हणजे भरतीत न उतरता तरुणाला बोगस आॅर्डर दिली. आता गावात बोभाटा केला म्हणून तुला नोकरी मिळाली नाही, अशी थाप मारून पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यातील एका भामट्याला काही लोकांनी पकडून शुक्रवारी छावणी ठाण्यात नेले; परंतु या प्रकरणी कुठलीही नोंद ठाण्यात करण्यात आली नाही.
पकडलेला भामटा हा मूळचा झारखंडचा असून, तो औरंगाबादेत स्थायिक झालेला आहे. तो टीव्ही सेंटर परिसरात राहतो. फरार असलेला दुसरा भामटा हा सिडको भागातील रहिवासी असून, तो मूळचा नगर जिल्ह्यातील आहे.
महेश ज्ञानदेव दिवे (रा. दहाड बु., ता. राहता, जि. अहमदनगर) या तरुणाला सैन्यात नोकरी लावण्यासाठी म्हणून त्याच्या औरंगाबादेतील नातेवाईकांच्या ओळखीने एका भामट्याला साडेचार लाख रुपये देण्यात आले. पैसे दिल्यावर महेश ना कोणत्या भरतीत उतरला ना कुठे ट्रेनिंगला गेला. मात्र, चार महिन्यांपूर्वी सदर भामट्याने महेशला गावात जाऊन बंद लिफाफ्यामध्ये एक बोगस आॅर्डर दिली आणि गावात बोभाटा न करण्यास सांगितले.
संशय आल्यामुळे महेशने सदर आॅर्डर गावातील काही लोकांना दाखविली. त्यानंतर ती आॅर्डर बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आॅर्डर देणाऱ्या भामट्याला दिवे यांनी पकडून ठेवले आणि लोणी पोलीस ठाण्यात नेले. लोणी पोलिसांच्या सल्ल्यानुसार पकडलेल्या भामट्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न दिवे यांनी केला. मात्र, तीन-चार दिवसांनंतर सदर भामट्याने धूम ठोकली.
त्यानंतर महेश दिवे यांनी छावणी ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानंतर सदर भामटा औरंगाबादेत पुन्हा दिवे यांच्या नातेवाईकांना सापडला. त्याला पकडून त्यांनी सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडे नेले. तेथे भामट्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतल्यामुळे त्यांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. नंतर हे प्रकरण पुन्हा छावणी पोलिसांसमोर आले. मात्र, या प्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आली
नाही.
भामट्यावरच टाकला पुन्हा विश्वास
दिवे यांनी पकडून आणलेल्या एका भामट्यालाच दुसरा भामटा पकडून देण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदर भामट्याने छावणी पोलिसांना त्याचे नाव, पत्ता, फोन क्रमांक दिला; परंतु त्यांनी स्वत: शोध न घेता सदर भामट्यावरच दुसऱ्या भामट्याला शोधून आणण्याची जबाबदारी सोपविली आहे.
तक्रारदारांनी तक्रार दिलेली नाही. हे प्रकरण सिडको हद्दीतील आहे. तरीही त्यांनी तक्रार दिली, तर कारवाई निश्चित करण्यात येईल. पकडून आणलेल्या इसमाकडून पैसे माघारी घेण्यासाठी त्यांनीच मुदत घेतली आहे. आम्ही मदत करण्यास केव्हाही तयार आहोत.
-चंद्रकांत सावळे, पोलीस निरीक्षक, छावणी
महेश दिवे याने सदर भामट्यांना साडेचार लाख रुपये दिल्यानंतर सदर भामट्याने स्वत:च्या नावे असलेला एक धनादेश दिला होता. आॅर्डर बोगस निघाल्यावर आपली फसवणूक झाली, हे लक्षात येताच दिवे यांनी सदर धनादेश बँकेत टाकला; परंतु खात्यावर पैसे नसल्यामुळे धनादेश वटला नाही. विशेष म्हणजे चार वेळा धनादेश बँकेने माघारी पाठविला आहे. ही माहितीही छावणी पोलिसांना देण्यात आली होती; परंतु त्यांनी काहीही कारवाई केली नाही.