जेट एअरवेजचे उन्हाळ्यात औरंगाबादहून पुन्हा ‘टेकऑफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 14:34 IST2022-01-20T14:33:41+5:302022-01-20T14:34:16+5:30
तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

जेट एअरवेजचे उन्हाळ्यात औरंगाबादहून पुन्हा ‘टेकऑफ’
औरंगाबाद : जेट एअरवेजची औरंगाबादहून मार्च, एप्रिलअखेर पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोनाची तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजची विमानसेवा तीन वर्षांपूर्वी बंद पडली होती. परिणामी, औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीला मोठा फटका बसला. पर्यटन, उद्योग क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला; परंतु त्यानंतर काही दिवसांत औरंगाबादहून इंडिगोची विमानसेवा सुरू झाली. कोरोनाच्या विळख्याने औरंगाबादच्या विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्यात विमानसेवा वाढीकडे आता पुन्हा सर्वांचे लक्ष लागले आहे. जेट एअरवेजने पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे; परंतु कोरोनामुळे ही सेवा सुरू होणे काहीसे लांबणीवर पडले. मात्र, आता समर शेड्युल म्हणजे उन्हाळ्यात जेट एअरवेज पुन्हा एकदा औरंगाबादहून सुरू होईल, असे संकेत आहेत. कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरू होणार आणि त्याचे वेळापत्रक आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुन्हा सुरू होणार
जेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे; परंतु कधीपासून सुरू होणार, हे अजून स्पष्ट नाही. कोरोना प्रादुर्भावामुळे ही विमानसेवा सुरू होणे लांबले आहे
- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ
समर शेड्युलमध्ये नियोजन
औरंगाबादहून जेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होईल, यात शंका नाही. समर शेड्युलमध्ये विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन होऊ शकते.
- अहेमद जलील, एरिया मॅनेजर, जेट एअरवेज