जालनेकर म्हणाले, वाद नको, पीटलाइनसाठी औरंगाबादला आमचेही सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 19:01 IST2022-03-07T19:00:29+5:302022-03-07T19:01:30+5:30
‘दमरे’मध्ये अनेक ठिकाणी जवळजवळ दोन-दोन पीटलाइन आहेत

जालनेकर म्हणाले, वाद नको, पीटलाइनसाठी औरंगाबादला आमचेही सहकार्य
औरंगाबाद : जालन्यात पीटलाइनची मागणी मार्गी लागली आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादेतील पीटलाइनदेखील मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले जाईल. रेल्वे संघटनांमध्ये वादविवाद होता कामा नये, असे नमूद करीत जालन्यातील रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पीटलाइनवरून सुरू असलेला वाद शमविण्यासाठी मध्यस्थी केली.
जालना येथे मराठवाडा रेल्वे विकास समिती, मराठवाडा रेल्वे कृती समिती आणि जालना रेल्वे संघर्ष समितीची नुकतीच बैठक पार पडली. याप्रसंगी ओमप्रकाश वर्मा, अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, श्यामसुंदर मानधना, फिरोज अली, गणेशलाल चौधरी, सुभाषचंद्र देविदान, आदींची उपस्थिती होती. जालना येथे पीटलाइन होत आहे. औरंगाबादलाही पीटलाइन करण्यास आम्ही सहकार्य करू. दक्षिण मध्य रेल्वेत छोट्या-मोठ्या गावात दोन-दोन, चार-चार पीटलाइन आहेत. त्यामुळे जालना आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी पीटलाइन होऊ शकतात, असे यावेळी उपस्थित जालन्यातील पदाधिकाऱ्यांनी म्हटले. अनंत बोरकर म्हणाले, चिकलठाणा येथे पीटलाइन झालीच पाहिजे आणि रेल्वेला हे काम करावे लागणार आहे.
बैठकीतील ठराव
मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचा विकास करून येथे लूपलाईनची व्यवस्था करावी. यामुळे रेल्वेंची क्राॅसिंग शक्य होईल. मुकुंदवाडीला तपोवन एक्स्प्रेसला थांबा द्यावा. शेंद्रा एमआयडीसी येथे नवीन रेल्वे स्टेशन, मालधक्का निर्माण करण्यात यावा. जालना-औरंगाबाद मार्गावरील दिनेगाव स्टेशन हे अनेक वर्षांपासून बंद आहे. ते त्वरित सुरू करावे, असा ठराव या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.