जालना रोड तीन तास ठप्प
By Admin | Updated: April 28, 2016 00:21 IST2016-04-28T00:03:06+5:302016-04-28T00:21:32+5:30
औरंगाबाद : रामा आणि अॅम्बेसिडर हॉटेलमध्ये होणारे लग्न व इतर समारंभाच्या वेळी रस्त्यावर करण्यात येणाऱ्या पार्किंगमुळे शहराची ‘लाईफ लाईन’ समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.

जालना रोड तीन तास ठप्प
औरंगाबाद : जालना रोडवरील रामा आणि अॅम्बेसिडर हॉटेलमध्ये होणारे लग्न व इतर समारंभाच्या वेळी रस्त्यावर करण्यात येणाऱ्या पार्किंगमुळे शहराची ‘लाईफ लाईन’ समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे तीन तास मोठी कोंडी झाली. दोन्ही बाजूने दूर-दूरपर्यंत वाहने खोळंबली होती. त्यामुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.
शहराचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रोडवर रामा इंटरनॅशनल आणि अजिंठा अॅम्बेसिडर ही दोन्ही पंचतारांकित हॉटेल्स् आहेत. लग्न व विविध समारंभांसाठी येथील लॉन भाड्याने देण्यात येते; परंतु या समारंभासाठी येणाऱ्या अतिथींच्या वाहन पार्किंगसाठी या दोन्ही हॉटेलकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. या दोन्ही हॉटेलच्या पार्किंगच्या जागेवर गार्डन आणि लॉन्स करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे लग्न समारंभासाठी आलेले अतिथी थेट रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. बुधवारी अॅम्बेसिडर हॉटेलच्या गार्डनमध्ये विवाह समारंभ होता. नित्याप्रमाणे आलेल्या अतिथींनी आपली वाहने हॉटेलच्या गेटसमोरच उभी केली. पाहता पाहता पार्किंग केलेली वाहने थेट जालना रस्त्यावर आली. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपासून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली. एक तर सायंकाळी सर्व कार्यालये सुटल्यानंतर जालना रोडवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे सात वाजेनंतर तर हॉटेलसमोर पार्क केलेल्या वाहनांनी केलेल्या अडथळ्यांमुळे वाहतुकीचा वेग इतका मंदावला की, एक-दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तास म्हणजेच हा संपूर्ण विवाह समारंभ संपेपर्यंत वाहतुकीची कोंडी कायम होती. वाहनचालकांचे या कोंडीमुळे प्रचंड हाल झाले.
नित्याचीच बाब
या दोन्ही हॉटेलने पार्किंगच्या जागाच गायब केल्यामुळे येथे रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगमुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या अतिथींची नीट वाहने उभी करावी, यासाठी हॉटेल व्यवस्थापन कोणतीही काळजी घेताना दिसत नाही. दर दोन-तीन दिवसाआड रामा, अॅम्बेसिडर हॉटेलचे लॉन काही ना काही समारंभासाठी भाड्याने दिले जात आहेत. त्यामुळे शहराच्या लाईफ लाईनची कोंडी आणि वाहनचालकांचे हाल ही नित्याचीच बाब बनली आहे.
हॉटेलचे म्हणणे...
या संदर्भात अॅम्बेसिडरचे सरव्यवस्थापक निर्मल त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हॉटेलमध्ये पुरेशी पार्किंग असून ती पूर्णपणे भरल्यामुळे आम्ही पार्किंग बंद केली. त्यामुळे रस्त्यावर लावलेल्या गाड्यांसाठी आम्ही जबाबदार नाही.
रामा इंटरनॅशनलच्या व्यवस्थापनाशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.
कारवाई करणार
रामा इंटरनॅशनल आणि अजिंठा अॅम्बेसिडर या दोन्ही हॉटेलांमधील पार्किंगच्या जागेचा वापर दुसऱ्याच कारणासाठी होताना दिसून येत आहे. या दोन्ही हॉटेलने त्यांच्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेलच्या आवारातच पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या हॉटेलच्या पार्किंगच्या जागेबाबत आम्ही महानगरपालिकेकडे माहिती मागविणार आहोत. त्यानंतर हॉटेलविरुद्ध कारवाई करण्यात येईल. - खुशालचंद बाहेती, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा.