जय हो भोलेनाथ! महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:59 IST2025-02-26T12:52:12+5:302025-02-26T12:59:20+5:30
भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन होण्यासाठी जाण्याचा व येण्याचा वेगळा मार्ग करण्यात आला आहे.

जय हो भोलेनाथ! महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
- सुनील घोडके
खुलताबाद: महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्री १० वाजेपासूनच भाविकांची गर्दी झाली. भाविकांना सुरळीत दर्शन होण्यासाठी जाण्याचा व येण्याचा वेगळा मार्ग करण्यात आला आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर ओळखले जाते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासून देशभरातून भाविक वेरूळनगरीत दाखल झाले आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर देवस्थान, महसूल व पोलीस प्रशासनाने चा व्यवस्था केली आहे. भाविकांचे रांगेत सुटसुटीत दर्शन व्हावे म्हणून प्रशासन परिश्रम घेत आहे. रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. भाविकांसाठी पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद व परिसरातील भाविकांना महाशिवरात्रीला दर्शनासाठी आधारकार्ड दाखवून पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आज दुपारी ४ वाजता मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक शिवालय तीर्थकुंडावर जाणार असून त्याठिकाणी महापुजा होऊन परत मंदीरात येणार आहे. आज रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या हस्ते शासकीय महापुजा होणार आहे. रात्रीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे मंदीर परिसरात तळ ठोकून असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळत आहेत.
येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगळा
वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर असून महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीला राज्य व परराज्यातून दर्शनासाठी येत असल्याने प्रथमच दर्शनासाठी मुख्य गेटने प्रवेश होऊन दर्शन झाल्यानंतर मंदीराच्या पाठीमागून नवीन गेट पुरातत्व विभागाच्या सहकार्याने तयार करून त्या मागील गेटने भाविक बाहेर पडणार असल्याने गाभा-यात सभामंडपात भाविकांची गर्दीच होणार नसल्याने सुलभ दर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे बाहेरील दर्शन रांग झिकझँक पध्दतीने बँरीकेट लावण्यात आले आहे, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.