‘दख्खनचा ताज’च्या संरक्षक भिंतीत गूळ, डिंक, उडदाची डाळ, कशासाठी माहितेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:57 IST2024-12-06T18:56:07+5:302024-12-06T18:57:11+5:30
मकबरा परिसरात संवर्धनाचे काम सुरू : ऐतिहासिक भिंत पुन्हा एकदा उजळतेय

‘दख्खनचा ताज’च्या संरक्षक भिंतीत गूळ, डिंक, उडदाची डाळ, कशासाठी माहितेय?
छत्रपती संभाजीनगर : स्वयंपाक घरात वापरला जाणारा गूळ, डिंक, मेथी, उडदाच्या डाळीसह अनेक पदार्थांचा वापर करून जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबऱ्याच्या संरक्षक भिंतीची उभारणी केली आहे. अनेकांना कदाचित हे माहीत नसेल. पण, हे खरे असून, सध्या याच संरक्षक भिंतीच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘त्या’ काळी जे पदार्थ वापरून ही भिंत साकारली, त्याच पदार्थांचा, साहित्यांचा वापर केला जात आहे. त्यातून ही ऐतिहासिक भिंत पुन्हा एकदा उजळून निघत आहे.
बीबी का मकबऱ्याच्या चारही बाजूने संरक्षक भिंत आहे. ही भिंत कमानदार, नक्षीदार आणि जाळीची आहे. गेल्या अनेक वर्षांच्या काळात या भिंतीची जागोजागी दुरवस्था झाली. ही दुरवस्था दूर करण्याचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने हाती घेतले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डाॅ. शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम केले जात आहे. संरक्षण सहायक संजय रोहणकर यांच्या निगराणीखाली संरक्षक भिंतीच्या संवर्धनाचे काम सुरू आहे.
कोणकोणत्या साहित्यांचा वापर?
संवर्धनाच्या कामासाठी थेट सिमेंट, चुना यांचा वापर करता येत नाही. ज्या मूळ साहित्यांचा वापर करून ऐतिहासिक वास्तू उभी राहते, त्याच पदार्थांचा वापर केला जातो. संरक्षक भिंतीसाठी चुना, विटांचा चुरा, गूळ, डिंक, ज्यूट, अंबाडी, उडदाची डाळ, मेथी, बाल हिरडा, गुगुळ, सिरस आदी एकत्रित केले जात आहेत. त्याचा वापर प्लास्टर, दगडी जाळी तयार करण्यासाठी होत आहे. संरक्षक भिंतीवरील तुटलेल्या छोट्या मिनारच्या जागी नव्याने तयार केलेले मिनार बसविण्यात येत आहे.
मिनारचे कामही लवकरच
मकबऱ्याच्या चारही मिनारचे टप्प्याटप्प्यात संवर्धन केले जाणार आहे. मिनारच्या प्लास्टरसाठीही चुन्यासह गूळ डिंक, उडीद डाळ, विटांची पावडर आदी वापरण्याचे नियोजन आहे. आता लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.