गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार- निपुण विनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:13 IST2018-05-17T01:13:24+5:302018-05-17T01:13:40+5:30

महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.

It will take time to get on the train track- Neptune Vinayak | गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार- निपुण विनायक

गाडी रुळावर येण्यास वेळ लागणार- निपुण विनायक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उंचीवर गेल्यानंतर मला भीती वाटत होती. ही भीती घालविण्यासाठी मी पॅराग्लाइडिंग करायला लागलो. औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून काम करण्याचे आव्हानही असेच मोठे आहे. एका दिवसात महापालिकेचे चित्र बदलणार नाही. नागरिकांमध्ये मनपाबद्दल विश्वास निर्माण करणे, प्राधान्यक्रमाने कचरा, पाणी या प्रश्नांचा निपटारा करणे आवश्यक आहे. महापालिकेची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा वेळ निश्चितच लागणार असल्याचे मत नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.
मंगळवारी सायंकाळी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच बुधवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. सायंकाळी पत्रकारांसोबत मनमोकळेपणे गप्पा मारताना त्यांनी नमूद केले की, चंदीगड हे माझे मूळ गाव, एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर २००१ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालो. दिल्लीत मागील पाच वर्षांपासून काम करीत होतो. त्यापूर्वी मराठवाड्यात नांदेड महापालिका, जालना येथेही काम केले आहे. औरंगाबाद महापालिकेचा मी सध्या बारकाईने अभ्यास करतोय. साधारण आठ ते दहा दिवसांचा अवधी लागेल. आजच वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बसून आढावा घेतला. कोणत्याही कामासाठी नागरिकांना महापालिकेत येण्याची गरज नाही. वॉर्ड अधिका-यांनी स्वत: आयुक्त म्हणून काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत. महापालिकेत आव्हाने खूप आहेत. प्रशासनाला स्वत:मध्ये व्यावसायिकपणा आणावा लागेल. अधिका-यांची टीम तयार करावी लागणार आहे. प्रत्येक समस्येसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, उल्लेखनीय कार्य करणा-या संस्थांसोबत पार्टनरशिप करावी लागेल. लोकसहभाग वाढणेही तेवढेच महत्त्वाचे वाटते.
नागरिक चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे आल्यास महापालिका प्रशासन नऊ पावले पुढे जाईल. लोकांना सांगण्यापेक्षा स्वत: आधी करून दाखविण्यावर आपला अधिक विश्वास आहे. शहराची बलस्थाने कोणती हे लक्षात घेऊन काम करण्यात येईल. कच-याचे शहर ही प्रतिमा पुसून काढण्यात येईल. प्रशासन आणि नागरिक, अशी एक चेन तयार करण्यात येणार आहे.

Web Title: It will take time to get on the train track- Neptune Vinayak