बदल्यांचा मुहूर्त ठरणार सोमवारनंतरच
By Admin | Updated: May 14, 2016 00:13 IST2016-05-14T00:05:11+5:302016-05-14T00:13:19+5:30
औरंगाबाद : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी हे सुटीवर गेले असून, ते सोमवारी जि. प. मुख्यालयात हजर होणार आहेत. त्यांच्या संमतीनेच बदल्यांची तारीख निश्चित केली जाणार आहे.

बदल्यांचा मुहूर्त ठरणार सोमवारनंतरच
औरंगाबाद : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी हे सुटीवर गेले असून, ते सोमवारी जि. प. मुख्यालयात हजर होणार आहेत. त्यांच्या संमतीनेच बदल्यांची तारीख निश्चित केली जाणार आहे.
दरम्यान, जि. प. शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले असून, जि. प. मुख्यालय तसेच पंचायत समित्यांमध्ये चांगलीच गर्दी वाढायला लागली आहे. शिक्षण विभागाने प्रशासकीय बदलीपात्र शिक्षकांची आक्षेप यादी जाहीर केली आहे. सध्या शिक्षण विभागाने बदल्यांची प्रक्रिया सुरू केली असली तरी ‘सीईओ’ सुटीवर असल्यामुळे त्यांची मान्यता घेतल्यानंतरच बदल्यांच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. दुसरीकडे, शासन निर्णयानुसारच बदल्या कराव्यात, बदल्यांचे निकष परस्पर बदलू नयेत, अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे. १५ मे २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३१ मेपर्यंतच बदल्या कराव्यात, ३१ मेपर्यंत सलग वास्तव्य सेवा गृहीत धरावी, सलग वास्तव्याची आस्थापना ही जि. प. कार्यालय, पं. स. कार्यालय, प्राथमिक शाळा असलेले महसुली गाव हे ग्राह्य धरावे, या अटींची पूर्तता करावी; पण अनेकदा शिक्षकांच्या बाबतीत शाळा असलेले महसुली गाव हा निकष न धरता केवळ प्राथमिक शाळा एवढेच दीर्घ वास्तव्य ग्राह्य धरले जाते. एका महसुली गावाच्या शिवारात अनेक वस्तीशाळाही कार्यरत आहेत. त्यामुळे वस्तीशाळेवरील शिक्षक अथवा गावातील प्राथमिक शाळेवरील शिक्षकांची अनेकदा बाहेरगावी बदली न करता त्याच गावातील दुसऱ्या शाळेवर केली जाते. असे होऊ नये, याचे काटेकोरपणे शिक्षण विभागाने पालन करावे, अशी मागणी आता पुढे आली आहे.
दरम्यान, अन्यायग्रस्त शिक्षिका महाजन व गायकवाड या दोघींचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. महाजन व गायकवाड या दोघीही आजारी आहेत. त्यांनी उपोषण सोडावे म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी काल व आज दोन्ही दिवस त्यांची भेट घेतली. सोमवारी ‘सीईओ’ आल्यानंतर निर्णय घेऊ, असे पत्रही उपोषणकर्त्या शिक्षिकांना शिक्षण विभागाने दिले; पण त्या उपोषण सोडायला तयार नाहीत. त्या शिक्षिकांच्या उपोषणाला प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटीलप्रणीत), शिक्षक भारतीने पाठिंबा दिलेला आहे.