‘असे वाघासारखे मरण हवे’

By Admin | Updated: June 28, 2014 01:16 IST2014-06-28T00:30:30+5:302014-06-28T01:16:50+5:30

विशाल सोनटक्के, उस्मानाबाद ‘सांजा चौक परिसरातीलच अमर वसंतराव बोचरे या सैन्य दलातील तरुणाला २००८ मध्ये वीरमरण आले.

'It must die like a tiger' | ‘असे वाघासारखे मरण हवे’

‘असे वाघासारखे मरण हवे’

विशाल सोनटक्के, उस्मानाबाद
‘सांजा चौक परिसरातीलच अमर वसंतराव बोचरे या सैन्य दलातील तरुणाला २००८ मध्ये वीरमरण आले. त्याचा अंत्यविधी गावसूद येथे शासकीय इतमामात झाला. या अंत्यसंस्कारासाठी उमेश जावळेसह आम्ही मित्रमंडळी गावसूदला गेलो होतो. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिल्यानंतर सोबत असलेल्या उमेशच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मात्र त्याही स्थितीत तो म्हणाला होता, ‘मित्रा...मरावं तर असंच वाघासारखं..’ सहा वर्षापूर्वीची ही आठवण काढून शहीद जवान उमेश जावळे यांचा मित्र श्रीकांत पांढरे ओक्साबोक्शी रडू लागला. वाघासारखं मरण हवं, असं सांगणाऱ्या उमेशला ग्यारापत्तीच्या जंगलात नक्षल्यांशी वाघासारखे लढतानाच वीरमरण आले.
मेंढा येथील उमेश पांडुरंग जावळे याचे प्राथमिक शिक्षण मेंढा येथे तर माध्यमिक शिक्षण लासोना येथे झाले. आई-वडील आणि बहीण एवढंच कुटुंब. मात्र अवधी एक एकर जमीन असल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. मात्र त्याही परिस्थितीत त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. लासोन्यातून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीसाठी त्याने उस्मानाबाद येथील जि. प. च्या मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सांजा चौकातील अरविंद रामहारी रणखांब या मावस चुलत्याकडे राहूनच तो शिक्षण पूर्ण करीत होता. शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून सकाळी पहाटे उठून तो पेपर टाकायचा. याबरोबरच कॉलेज सुटल्यानंतर पिग्मीही गोळा करायचा. अशा पद्धतीने आर्थिक गणिताची गोळा बेरीज करीत असताना सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्नही तो पाहू लागला. सांजा चौक, भवानी चौक या परिसरातील सुमारे सतरा ते अठरा जण पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्याप्रमाणेच पोलीस व्हावे, असे त्याला वाटायचे.
धनंजय शेरखाने, श्रीकांत पांढरे, रमाकांत जमादार यांच्यासह त्याचा मोठा मित्रवर्ग होता. यातील बहुतांश जण पोलीस तसेच सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रयत्न करीत होते. २०१० मध्ये उमेशच्या प्रयत्नांना यश आले. आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तो रुजू झाला. गडचिरोलीला असतानाही तो सातत्याने मित्रांच्या संपर्कात असायचा. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत श्रीकांत पांढरे याची संधी दोन गुणांनी तर धनंजय शेरखाने याची संधी सात गुणांनी हुकली. काहीसे निराश झालेल्या या मित्रांना उमेशने थेट गडचिरोलीहून फोन करून धीर दिला होता. आणखी नव्या दमाने सराव करा. येणाऱ्या भरतीत तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास दिला होता.
आठ दिवसापूर्वी उमेशच्या चुलत बहिणीचे मेंढा येथे लग्न होते. लग्नासाठी तो आवर्जून आला होता. बहिणीचे लग्न जमविण्याचेही त्याचे प्रयत्न सुरू होते. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ड्युटीवर जातानाही त्याने मित्रांना फोन केला होता. बदली झाली असे तो सांगत होता. मात्र पहाटे गडचिरोलीहून वार्ता आली ती तो शहीद झाल्याची. या बातमीने सांजा चौक परिसरात एकच शोककळा पसरली. अनेक जणांना त्याच्या आठवणी सांगताना हुंदका आवरत नव्हता. अंत्यसंस्कारप्रसंगी भाजपाचे प्रदेश चिटणीस सुजितसिंह ठाकूर, आ. ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मंजुळे, जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, संजय निंबाळकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अ‍ॅड. अनिल काळे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, अ‍ॅड. मिलींद पाटील, दिलीप जावळे, गुलचंद व्यवहारे, लक्ष्मण माने, दिनेश देशमुख आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते़
नियोजनात हलगर्जीपणा
शहीद जवान उमेश जावळे याच्या पार्थिवावर मेंढा येथे सायंकाळी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अंत्यसंस्कारस्थळी एक मंडप वगळता इतर बाबींच्या नियोजनाचा अभाव आढळला. पार्थिव मेंढा येथे आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठीचे साहित्य आणण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यात पावसाने हजेरी लावल्याने मूळ नियोजनही ढेपाळले. प्रशासनासह ग्रामस्थांनी याबाबत योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती. अशा प्रतिक्रिया अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित असलेल्या अनेकांनी व्यक्त केल्या.
रडण्याचा नाही.. लढण्याचा इतिहास
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेकांनी देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले आहे. या शुरवीरांच्या यादीत आज उमेश जावळेही सहभागी झाला. १९६२ च्या भारत-चीन युद्धात कोल्हेगावच्या भगवान महाडिक यांना हौतात्म्य आले तर १९७१ ला झालेल्या भारत-पाक युद्धात खानापूर येथील रामाराम निकम, लोहारा तालुक्यातील धानुरी येथील शहाजी नारंगवाडे, तावशीगड येथील गोविंद सोनटक्के आणि उमरगा तालुक्यातील पळसगाव येथील पंडित जाधव यांनी शत्रूंशी लढताना बलिदान दिले. १९८९ मध्ये तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील विश्वनाथ कदम, १९८७ मध्ये गुळहळ्ळी येथील रामसाधू गायकवाड तर १९९९ मध्ये तुळजापूर तालुक्यातील शिराढोण येथील शिरीषकुमार भिसे आणि १९९३ मध्ये सांजा रोडवरील शेख बशीर हसन हे जम्मू-काश्मीरमध्ये लढताना शहीद झाले. सैन्य दलाप्रमाणेच जिल्ह्यातील पोलिसांनीही हौतात्म्य पत्करले.
‘मला माझा भैय्या हवाय...’
शहीद उमेश जावळे याचे पार्थिव विशेष हेलिकॉप्टरने उस्मानाबाद विमानतळावर आणण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर ते अंत्यसंस्कारासाठी मेंढा येथे आणण्यात आले. यावेळी उमेशच्या आई द्रोपदी, वडील पांडूरंग यांच्यासह नातेवाईकांच्याही आश्रुंचा बांध फुटला. अंत्यसंस्कारसमयी उमेशची बहीण वंदना ओक्साबोक्सी रडत होती. ‘मला माझा भैय्या हवाय...’ या तिच्या आक्रोशाने उपस्थित जनसमूह गहिवरून गेला होता.
सांजा चौकात मित्रांची सलामी
उमेश जावळेचे सांजा चौक तसेच भवानी चौकाशी ऋणानुबंध होते. याच परिसरात तो वाढला. त्यामुळे त्याचा मित्रवर्गही मोठा आहे. उमेश शहीद झाल्याचे वृत्त आल्यानंतर सकाळपासूनच सारे अस्वस्थ होते. उमेशचे पार्थिव उस्मानाबाद विमानतळावर आले असून, ते सांजा चौकमार्गे मेंढा येथे नेण्यात येणार असल्याचे माहित झाल्यानंतर त्याच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी सांजा चौकात मोठी गर्दी केली होती. उमेशचे पार्थिव घेऊन जाणारी गाडी चौकात आली. त्याचवेळी जोराचा पाऊसही सुरू झाला. मात्र या तरुणांनी गाडी थांबवून तेथेच लोटांगण घालून या लाडक्या मित्राला सलामी दिली. त्याच वेळी उमेश जावळे अमर रहे..चा घोष सुरू होता.
शासन, समाजाने पाठीशी रहावे...
गडचिरोली जिल्ह्यात शहीद झालेल्या उमेश जावळेच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दोन खोल्यांचे घर असलेल्या उमेशच्या कुटुंबियांची गुजरान अवघ्या एक एकर जमिनीवर सुरू आहे. कर्ता मुलगा गेल्याने आई-वडिलांसह उमेशची बहीणही हवालदिल झाली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी शासनाने ठामपणे उभे रहावे, अशी मागणी अनेकांनी अंत्यसंस्कारप्रसंगी केली. उमेशने कष्ट करून शिक्षण घेतले होते. तसेच संकटाची जाणीव असतानाही निर्भिडपणे तो गडचिरोलीत देशसेवा करीत होता. त्यामुळे शासनाप्रमाणेच समाजानेही उमेशच्या कुटुंबियाच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.
जिल्ह्याचा वीर सुपुत्र
घरची परिस्थिती हालाखीची असली तरी मोठ्या जिद्दीने देशसेवेसाठी उमेश जावळे पोलिस दलात दाखल झाला होता़ नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात उमेशला वीरमरण आले. देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरमरणामुळे उस्मानाबाद जिल्हा शूरविरांचा असल्याचे पुन्हा समोर आले आहे़ एकुलता एक मुलगा शहीद झाल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले असून, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता समाजाने त्यांच्या पाठीशी उभा रहावे, असे भाजपाचे प्रदेश चिटणीस सुजितसिंह ठाकूर म्हणाले़
नक्षलवाद मोडण्याची गरज
नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक जवान शहीद झाले आहेत़ अशाच हल्ल्यात जिल्ह्याचा वीर सुपुत्र उमेश जावळे हा शहीद झाला आहे़ वारंवार होणाऱ्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आहेत़ त्यामुळे राज्य शासनाने, केंद्र शासनाने नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे़ जावळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, शासनाने त्यांचे पालकत्व स्विकारावे, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली़
देशसेवेची तळमळ होती
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेला उमेश जावळे हा माझा मित्र होता़ शिक्षण घेताना आम्ही बराच काळ एकत्रित घालविला आहे़ शालेय, महाविद्यालयीन जीवनातही देशसेवेसाठी त्याचे विचार इतरांना प्रभावित करणारे होते़ देशसेवेसाठीच त्याने पोलिस दलात अथक प्रयत्नातून नोकरी मिळविली़ मात्र, त्याला शुक्रवारी पहाटे वीरमरण आले़ ही घटना दु:खद असली तरी देशसेवेसाठी त्याने अखेरपर्यंत आपले विचार ठेवले, याचा अभिमान असल्याचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मंजुळे यांनी सांगितले़
कार्य युवकांना प्रेरणादायी
देशासमोर बाहेरील व अंतर्गत काही समस्यांनी ग्रासले आहे़ नक्षलवाद हा त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न असून, तो नक्षलवाद संपविण्यासाठी पोलिस जवानांनी गुरूवारी रात्री जंगलात कारवाई केली़ मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात उमेश जावळे या शूर जवानाला वीरमरण आले़ त्याने देशसेवेसाठी केलेले काम हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे़ देशसेवेसाठी मेंढा गावचा नव्हे तर जिल्ह्याचा सुपूत्र शहीद झाल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख म्हणाले़

Web Title: 'It must die like a tiger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.