बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:24 IST2021-02-01T19:22:57+5:302021-02-01T19:24:44+5:30
झाल्टा जंक्शन ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्यावर एक-एक पदर वाढवून वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्यात येत आहे.

बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात; रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरु
औरंगाबाद : अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व दुतर्फा वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा वाहतूक प्रवास सुरळीत व्हावा म्हणून सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमणे पाडली. अनेकांनी स्वत: काढून घेतली. दोन्ही बाजूने एक पदर वाढविल्याने सहा पदरी रस्ता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु तीन वर्षांनंतरही सर्व्हिस रोडचा प्रश्न बासनात पडला आहे.
दक्षिण औरंगाबाद शहराच्या नावाने उदयास येत असलेल्या सातारा- देवळाई परिसराकडे पाहिले जात आहे. झाल्टा जंक्शन ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्यावर एक-एक पदर वाढवून वाहतुकीसाठी रस्ता तयार करून देण्यात येत आहे. परंतु जड वाहनांमुळे अद्यापही अपघाताचे प्रमाण टळलेले नाही, दोन दिवसांपूर्वीच दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला. दररोज किरकोळ स्वरूपाच्या अपघाताच्या घटना घडतच आहेत. पोलीस आयुक्त ते सार्वजिनक बांधकाम विभाग, मनपा, आरटीओ, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या आहेत. दरवेळी रस्त्याचा विषय ऐरणीवर घेण्यात आलेला आहे; परंतु त्याकडे कुणीही फारसे लक्ष दिलेले नाही.
रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरू
अतिक्रमणे पाडली, रस्ता मोकळा केला; परंतु त्यावर भाजीपाला, तसेच व्यावसायिकांच्या गाड्या पुन्हा उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अघोषित वाहनतळ निर्माण होत आहे. पुन्हा मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी लागते की काय, असा सवाल दक्ष नागरिकांतून उपस्थित होत आहे. महानुभाव आश्रम ते देवळाई फाटा वाहनाच्या वर्दळीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्वरित लक्ष देऊन सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, प्रश्न बासणात पडला असल्याचा समज नागरिकांचा झाला आहे.
दुतर्फा वाढवून डांबरीकरण होणार...
बायपास रस्त्याच्या दुतर्फा एकेक पदरी रस्ता वाढविण्याचे काम सुरू असून, नियोजित सर्व्हिस रस्त्याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील. रस्त्याचे काम जोरात सुरू असून, जनतेसाठी तो लवकरच वापरात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- सुनील कोळसे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)