तुम्ही बसलेल्या रिक्षाचा चालक गुन्हेगार तर नाही ना? प्रवाशांवर हल्ला, लूटमार घटनांत गंभीर वाढ
By सुमित डोळे | Updated: June 10, 2025 19:54 IST2025-06-10T19:53:24+5:302025-06-10T19:54:08+5:30
केवळ रिक्षांचीच नोंद, चालविणाऱ्यांची नोंद ठेवणार कोण ?

तुम्ही बसलेल्या रिक्षाचा चालक गुन्हेगार तर नाही ना? प्रवाशांवर हल्ला, लूटमार घटनांत गंभीर वाढ
छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणावरून प्रवाशावर चाकूहल्ला, लूटमार, महिलांसोबत गैरवर्तन केले जात असताना ४ जूनला नशेखोर रिक्षाचालकाने प्रवाशाची थेट हत्या करत गुन्हेगारीचे टोक गाठले. या घटनेमुळे रिक्षा व्यवसायात नव्याने उतरलेल्या गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब बनत चालली आहे. शहरातील प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. मात्र, तरीही पोलिस विभागासह आरटीओ विभागाकडून याबाबत कठोर कारवाई केली जात नसल्यानेच गुन्हेगार रिक्षाचालकांचा आत्मविश्वास वाढत आहे.
२०१५ नंतर शहरात रिक्षांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. मात्र, रिक्षाचालकांवरील पोलिस, आरटीओ विभागाचे नियंत्रण सुटले. रिक्षाचालकांकडून सातत्याने प्रवाशांना मारहाण, लूटमार, चोरीच्या घटना घडत आहेत. परीक्षेसाठी शहरात आलेल्या श्रीरामपूरच्या जयराम बबन पिंपळे यांची पैशांवरून रिक्षाचालक मुजम्मील रफीक कुरेशीने हत्या केली. या घटनेनंतर ही बाब अधोरेखित झाली. सतत अमली पदार्थांच्या नशेत असलेला मुजम्मील मोठा चाकू बाळगून रिक्षा चालवत होता. यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे वाहन परवाना नाही. शासनदरबारी रिक्षाचालक म्हणून कुठलीही नोंदही नाही. तो चालवत असलेल्या रिक्षाचा मालक दुसराच निष्पन्न झाला. शहरात असे हजारो रिक्षाचालक राजरोस शस्त्रे बाळगून प्रवाशांची वाहतूक करतात. मात्र, त्यांना कोणाचाही धाक नाही.
अशी आहे वाहनांची संख्या
दुचाकी - ९ लाख ४८ हजार
चारचाकी - १ लाख ५५ हजार ५४८
ट्रीपल सीट रिक्षा - १४ हजार ५००
स्मार्ट सिटी बस (मनपा) - १००
लूटमार, अश्लील चाळे, पोलिसांवरही हल्ला
-१५ मे रोजी मोंढा परिसरात एका मद्यधुंद रिक्षाचालकाने भर रस्त्यावर धिंगाणा घातला.
-६ एप्रिल रोजी अशोक खापे या रिक्षाचालकाने विवेकानंद गालट यांच्या पोटात चाकू खुपसून हत्येचा प्रयत्न केला.
-२३ जानेवारी रोजी पोलिस अंमलदार अमोल मारकवाड यांना मद्यधुंद रिक्षाचालक महेश महाकाळेने गणवेश फाडून मारहाण केली. त्याच्यावर हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
-२३ ऑगस्ट, २०२४ रोजी समीर बाबा पठाण या विकृत रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीसमोर पँट काढून अश्लील चाळे केले. सिटी चाैक ठाण्याच्या गुन्ह्यात तो १८ दिवस कारागृहात होता.
परराज्यांतील चालक, नोंद ठेवणार काेण ?
प्रामाणिक रिक्षाचालकांच्या माहितीनुसार, शहरात अनेक रिक्षाचालक परराज्यांतील असून त्यांची कुठलीही नोंद पोलिस, आरटीओकडे नाही. काही परप्रांतीय किंवा दुसऱ्या शहरातून स्थलांतरित झालेले असतात. मूळ मालकाकडेही त्यांची माहिती नसते. अनेकांवर गुन्हे दाखल असतात. २०२१-२२ मध्ये तब्बल २२ गुन्ह्यांत रिक्षाचालकांचा थेट संबंध निष्पन्न झाला. तीन चालक परराज्यातील होते. एप्रिल, २०२३ मध्ये गुन्हे शाखेने सय्यद सोहेल सय्यद मेहमूद, शहजाद मंजूर शेख या रिक्षाचालकांना नशेच्या गोळ्यांची विक्री करताना पकडले होते. तीन वर्षांपूर्वी गुजरातच्या इब्राहिम शाह अकबर शाह या रिक्षाचालकाला नशेच्या ३९० गोळ्यांसह पाेलिसांनी पकडले होते.