पर्यटनाचा की पर्यटकांना लुटण्याचा हंगाम? बीबी का मकबऱ्यात पार्किंग शुल्काची मनमानी वसुली
By संतोष हिरेमठ | Updated: October 20, 2025 17:50 IST2025-10-20T17:49:17+5:302025-10-20T17:50:02+5:30
रिॲलिटी चेक: 'मकबरा' पाहणार की लूट सहन करणार? शुल्काचा फलक गायब करून पार्किंग चालकांकडून पर्यटकांची दिशाभूल

पर्यटनाचा की पर्यटकांना लुटण्याचा हंगाम? बीबी का मकबऱ्यात पार्किंग शुल्काची मनमानी वसुली
छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खनचा ताज’ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सध्या पार्किंग चालकाकडून सर्रास लूट सुरु आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या म्हणण्यानुसार, दुचाकीच्या पार्किंगसाठी ४ तासांसाठी १० रुपये शुल्क आहे; परंतु पार्किंग चालकाकडून मनमानी पद्धतीने दुप्पट वसुली केली जात आहे. चारचाकीसाठीही अशीच मनमानी ‘वसुली’ केली जात आहे. याकडे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा मात्र कानाडोळा होत आहे.
पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळेही बीबी का मकबऱ्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहे. या सगळ्यात पार्किंगमधील मनमानी वसुलीविषयी पर्यटकांमधून संताप व्यक्त होत आहे. परिसरातील पार्किंगमध्ये शुल्काचा फलकच नसल्याने पर्यटक गोंधळात पडतात आणि पार्किंगचालक त्याचा गैरफायदा घेतात.
शुल्काचा फलक गायब
बीबी का मकबरा परिसरातील पार्किंगमध्ये शुल्काचा फलकच नाही. त्यामुळे पार्किंगचे शुल्क किती आहे, हे पर्यटकांना कळू शकत नाही.
रस्त्यावरही पार्किंग
बीबी का मकबऱ्यासमोर थेट रस्त्यावरही पार्किंगची सोय करण्यात आली आहे. याठिकाणीही दुचाकी, चारचाकीधारकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली केली जात आहे.
मकबरा परिसरातील पार्किंग शुल्क
वाहन प्रकार- ४ तासांसाठी- ४ तासांपेक्षा अधिक वेळ
बस, मिनी बस - ६० रु. -८० रु.
कार, तीन चाकी- ३० रु.- ५० रु.
दुचाकी - १० रु.- २० रु.
सायकल - ५ रु. - १० रु.
चौकशी केली
याविषयी मी चौकशी केली. पार्किंगमधील बोर्ड खराब झाला आहे. आता त्याची दुरुस्ती केली जात आहे. लवकरच तो बसवला जाईल.
- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण.