'टेंडर निघाल्यास पाहू', बेजबाबदार 'पीडब्ल्यूडी'मुळे खड्ड्यांत अडकतोय छत्रपती संभाजीनगरकर

By सुमित डोळे | Updated: August 19, 2025 16:00 IST2025-08-19T15:59:54+5:302025-08-19T16:00:32+5:30

वाहतूक पोलिसांनी स्मरणपत्रे देऊनही पीडब्ल्यूडीचा बेजबाबदारपणा; खड्डे वाढल्याने छत्रपती संभाजीनगरचा वेग मंदावला

Irresponsible PWD department waiting for tender; Chhatrapati Sambhajinagarkar is stuck in potholes every day | 'टेंडर निघाल्यास पाहू', बेजबाबदार 'पीडब्ल्यूडी'मुळे खड्ड्यांत अडकतोय छत्रपती संभाजीनगरकर

'टेंडर निघाल्यास पाहू', बेजबाबदार 'पीडब्ल्यूडी'मुळे खड्ड्यांत अडकतोय छत्रपती संभाजीनगरकर

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील सर्वत्र पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वेग मंदावला आहे. तर दुसरीकडे पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाजच येत नसल्याने अनेक दुचाकीचालक, रिक्षांचा अपघात होत आहे. यापैकी लोखंडी पूल, बाबा चौकातील खड्ड्यांविषयी वाहतूक पोलिसांनी सा.बां. विभागाला चार वेळा पत्राद्वारे ठोस उपाययोजनांची मागणी केली. मात्र, टेंडर निघाल्यावर पाहू, असे बेजबाबदार उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी हात वर केले. यामुळे साऱ्या शहरवासीयांना मन:स्ताप होत आहे.

महिन्याभरापासून छावणी लोखंडी पूल ते महावीर चौक (बाबा चौक) दरम्यान मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचे खोल खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचून दुचाकी, रिक्षांचे अपघात होत आहेत. पोलिसांच्या पत्रव्यवहारानंतर सा.बां. विभागाने थातूरमातूर काम करत खड्डे बुजवले. मात्र, अवघ्या चोवीस तासांत माती व डांबर वाहून गेले. पोलिसांनी संबंधित विभागाला कळवले. मात्र, त्यानंतर त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. सोमवारी तीन दुचाकीस्वार व एक रिक्षाचा अपघात होता होता राहिल्यानंतर वाहतूक पोलिसांवरच हातात फावडे घेत मुरुमाने खड्डे बुजवण्याची वेळ आली.

पाच स्मरणपत्रे, कॉल, प्रतिसाद शून्य !
वाहतूककोंडी व वाढत्या अपघातांमुळे वाहतूक पोलिसांनी सा.बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना उपाययोजनांसाठी चार स्मरणपत्रे पाठवली. जवळपास ७ ते ८ वेळा कॉलही केले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे, एका अधिकाऱ्याने चक्क, ‘टेंडर निघाल्यावर पाहू’ असे उत्तर देत हात वर केल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटले.

साइट पंखेही उखडलेले
अमरप्रीत चौक ते नगर नाक्यापर्यंत संपूर्ण रस्त्यालगतचे साइट पंखे पूर्णपणे उखडले आहेत. परिणामी, मिल्ट्री मेस ते नगर नाक्यापर्यंत वळण घेणे अशक्य होऊन वाहतूककोंडी होते. यासंदर्भातही पोलिसांनी सूचना केली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

कुठे काय दिसले?
- सोमवारी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत लोखंडी पुलावर वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी मुरुमाद्वारे खड्डे बुजवत सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
- कोकणवाडी चौकात दुपारी १२ ते २ वाहने खोळंबली होती.
- अमरप्रीत चौकाकडून शहानूरमियाँ दर्गाच्या दिशेने वळण घेताना मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांना दुरून वळसा घ्यावा लागतो.
- सेव्हन हिल चौकाकडून गजानन महाराज मंदिर, तसेच मंदिराकडून सेव्हन हिलमार्गे आकाशवाणीकडे जाणाऱ्या वळणावर गट्टू निघाले असून खोल खड्डे पडले आहेत.

केंब्रिज चौकातही तेच !
केंब्रिज चौकात चारही बाजूंनी पडलेल्या खड्ड्यांबाबत बांधकाम विभागाला सातत्याने पत्रे पाठवण्यात आली. मात्र, उपयोग झाला नाही. तेथेही पोलिसांनाच खड्डे बुजवावे लागले.

२४ तासांत डांबर गेले वाहून
९ ऑगस्ट रोजी विभागाने माती व डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे नाटक केले. पोलिसांनी आक्षेप घेत खड्डे तांत्रिक पद्धतीने बुजवण्याची सूचना केली. मात्र, टेंडर निघाले नसल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यानंतर पडलेल्या पावसांत २४ तासांत माती, डांबर वाहून जात खड्डे उघडे पडले.

नागरिकांचा त्रास समजून घ्या
इतर विभागांच्या कामासाठी पोलिस तत्काळ प्रतिसाद देतात. आम्ही वारंवार सा. बां. विभागाला सांगितले. आमच्या मागण्या नागरिकांसाठी आहेत. वाहतूक समस्या सोडविण्याची जबाबदारी एकट्या पोलिसांची नाही. सर्वांनी मिळून यासाठी पुढाकार घेतला तर वाहतूक सुरळीत होईल. खाेल व मोठ्या खड्ड्यांमुळे होणारा नागरिकांना त्रास, वेदना सा. बां. विभागाने समजून घेतल्या पाहिजेत.
- प्रवीण पवार, पाेलिस आयुक्त

Web Title: Irresponsible PWD department waiting for tender; Chhatrapati Sambhajinagarkar is stuck in potholes every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.