बेजबाबदार महावितरण; तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:49 IST2024-12-07T17:49:37+5:302024-12-07T17:49:57+5:30

पहाटे झालेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे तारा तुटून पडल्या. मात्र ही बाब महावितरण विभागाला माहिती पडली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Irresponsible management of Mahavitran; A farmer and a goat died after being touched by a broken electric wire in the field | बेजबाबदार महावितरण; तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू

बेजबाबदार महावितरण; तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू

फुलंब्री : शेतात शेळ्या चारत असताना तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श होऊन बसलेल्या जोराच्या झटक्याने एका शेतकऱ्यासह शेळीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरात शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण काळू म्हस्के(वय ६४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

वडोद बाजार येथील लक्ष्मण म्हस्के हे शेतकरी शेतीसोबत शेळीपालन करतात. शुक्रवारी सकाळच्या वेळी नेहमी प्रमाणे ते १५ शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या गट नं. ३ मधील गिरीजा नदीच्या काठावर गेले होते. दरम्यान त्या ठिकाणी विद्युत प्रवाहित तारा तुटून पडलेल्या होत्या. एका शेळीला या तारांचा स्पर्श होऊन शेळी जागीच कोसळली. शेळी कशी काय कोसळली हे पाहण्यासाठी लक्ष्मण म्हस्के धावले. त्यांनी शेळीला स्पर्श करताच तेसुद्धा तारेला चिकटले. यात त्यांचाही जागीच मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या घरी आल्या. मात्र लक्ष्मण म्हस्के न दिसल्याने कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती तात्काळ पाथ्री येथील महावितरण कार्यालयाला देण्यात आली. त्यांनी विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर म्हस्के यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महावितरणचा गलथान कारभार
वडोदबाजार येथील स्मशानभूमीपासून काही अंतरावरील शेतवस्तीवर या विद्युत तारेद्वारे वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी पहाटे झालेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे सदरील तारा तुटून पडल्या. मात्र ही बाब महावितरण विभागाला माहिती पडली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेला महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Web Title: Irresponsible management of Mahavitran; A farmer and a goat died after being touched by a broken electric wire in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.