तपास फाइल झाली होती बंद; मात्र सतर्क पोलिसांमुळे सहा वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:56 IST2021-05-18T11:55:38+5:302021-05-18T11:56:36+5:30
crime news in Aurangabad पोलिसांनी ई चलन मशीनवर दुचाकीवरील क्रमांक टाकला असता, तो क्रमांक दुसऱ्या कंपनीच्या मोटारसायकलचा असल्याचे उघड झाले.

तपास फाइल झाली होती बंद; मात्र सतर्क पोलिसांमुळे सहा वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड
औरंगाबाद : सहा वर्षांपूर्वी नूतन कॉलनी येथून चोरी झालेली दुचाकी नाकाबंदीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागली. ही कारवाई सोमवारी सकाळी पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर रोडवर झाली.
संचारबंदीमुळे शहरातील ५४ ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावले आहेत. गजानन महाराज मंदिर चौकाजवळ पुंडलिक नगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार प्रभाकर सोनवणे आणि कर्मचारी सोमवारी सकाळपासून नाकाबंदी करीत होते. ११ वाजताच्या सुमारास त्यांनी एका दुचाकीस्वाराला अडविले. त्याने त्याचे नाव गणेश प्रल्हाद बमनावत (२६, रा. वांजोळा, पो. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या दुचाकीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले, तेव्हा कागदपत्रे आपल्याजवळ नाहीत आणि ही दुचाकी त्याचे मामा गोविंद मेहेर (रा. लालवाडी) यांनी त्याला वापरायला दिल्याचे तो म्हणाला.
पोलिसांनी ई चलन मशीनवर दुचाकीवरील क्रमांक टाकला असता, तो क्रमांक दुसऱ्या कंपनीच्या मोटारसायकलचा असल्याचे उघड झाले. संशय बळावल्याने बमनावतला दुचाकीसह ठाण्यात नेण्यात आले. दुचाकीच्या चेसीस क्रमांकाच्या आधारे दुचाकीचा क्रमांक आणि मालकाचे नाव तपासले. तेव्हा ही दुचाकी अमरीश जैस्वाल यांच्या नावे असून, २०१५ साली दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी असल्याचे स्पष्ट झाले. क्रांती चौक ठाण्यात नोंद असल्याचे समोर आल्यानंतर आरोपी बमनावत याला दुचाकीसह क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
तपास फाइल झाली होती बंद
सूत्राने सांगितले की, सिल्लोड तालुक्यातील रहिवासी अमरीश जगदीश जैस्वाल यांची मोटारसायकल नूतन कॉलनीतून २०१५ साली चोरट्यांनी पळविली होती. अमरिश यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तपास केला; मात्र चोर आणि दुचाकीचा शोध त्यांना लावता आला नव्हता. यामुळे चोर सापडत नाही, असा शेरा मारून तपास फाइल कपाटात ठेवण्यात आली होती.