चौकशी समिती ठरली ‘फार्स' !
By Admin | Updated: August 19, 2014 02:11 IST2014-08-18T00:15:32+5:302014-08-19T02:11:54+5:30
संजय तिपाले ,बीड शिक्षक बदल्यांतील अनियमिततेचे प्रकरण स्थायी समितीच्या बैठकीत चांगलेच गाजले होते़ त्यानंतर बदल्यांच्या चौकशीसाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांची विशेष समितीही नियुक्त केली होती;

चौकशी समिती ठरली ‘फार्स' !
संजय तिपाले ,बीड
शिक्षक बदल्यांतील अनियमिततेचे प्रकरण स्थायी समितीच्या बैठकीत चांगलेच गाजले होते़ त्यानंतर बदल्यांच्या चौकशीसाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांची विशेष समितीही नियुक्त केली होती;पण तीन आठवडे उलटूनही ना चौकशी झाली ना अहवाल आला़ त्यामुळे मोठा गाजावाजा करुन नेमलेली समिती तूर्त केवळ फार्स ठरली आहे़
जून महिन्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया पार पडली होती़ तत्पूर्वीच जिल्ह्यात जवळपास तीनशेहून अधिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने दाखल झाले़ त्यामुळे जिल्ह्यात आधीच अतिरिक्त असलेल्या १३० शिक्षकांच्या संख्येत भर पडली़ बिंदूनामावली निश्चित नसतानाच बदल्यांची प्रक्रि या राबवली गेली़
त्यामुळे २४ जुलै २०१४ रोजी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत नियमबाह्य बदल्यांवरुन गदारोळ झाला. बदल्या, दर्जावाढ, नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी सदस्यांसह सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे एक विशेष समिती नियुक्त करुन त्यामार्फत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निश्चित झाले.
विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, दशरथ वनवे, महेंद्र गर्जे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती, शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड, सर्व गट शिक्षणाधिकारी यांचा विशेष चौकशी समितीत समावेश आहे. दरम्यान, समितीच्या हाती अद्याप काहीच लागलेले नसून चौकशी पुढे सरकलेली नाही. त्यामुळे समिती तूर्त केवळ नावालाच उरल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शिक्षकांच्या बदल्यांतील अनियमितता तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड यांना शनिवारी पत्र दिले आहे. एकूण बदल्या, संवर्गनिहाय जागा, रिक्त जागा, अतिरिक्त शिक्षक आदी माहिती मागविली आहे. मात्र, अद्याप माहिती आली नाही. चौकशी सुरु नाही असे नाही. माहिती उपलब्ध होताच येणाऱ्या स्थायी समिती बैठकीत अहवाल सादर करु, असे ते म्हणाले.