खेळांडूंसाठी पर्वणी! देशातील सर्वात मोठा ऑलिम्पिक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक छत्रपती संभाजीनगरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:21 IST2025-07-16T19:19:57+5:302025-07-16T19:21:17+5:30
नोव्हेंबर महिन्यापर्यंत खेळाडूंसाठी होणार उपलब्ध

खेळांडूंसाठी पर्वणी! देशातील सर्वात मोठा ऑलिम्पिक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. मात्र, दर्जेदार सुविधांअभावी अनेकांना खेळ सोडावा लागला तर काहींनी दुसऱ्या शहराला पसंती दिली. तथापि, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑलिम्पिक धर्तीवर सिंथेटिक ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरातूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
२०२३ मध्ये मे महिन्यात सुरुवात झालेल्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सध्या ६० टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षी नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंना सरावासाठी हा सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध राहील, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विद्यापीठात होणारा हा सिंथेटिक ट्रॅक मराठवाड्यातील पहिला आणि देशातील सर्वांत मोठा असणार आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅक तयार होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक दर्जेदार व देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
केंद्र शासनाच्या ७ कोटी रुपये अनुदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणारा हा सिंथेटिक ट्रॅक ४०० मीटरचा आणि १० लेनचा असणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नातून २०२२ मध्ये सिंथेटिक ट्रॅकसाठी केंद्र शासनाचे ७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र, त्या वेळेस एजन्सी न ठरल्याने हे अनुदान रद्द करण्यात आले होते. मात्र, कुलगुरू विजय फुलारी यांच्या प्रयत्नातून ७ कोटींचे अनुदान मंजूर झाले आणि सिंथेटिक ट्रॅकच्या कामाचा श्रीगणेशा झाला. आतापर्यंत जवळपास ६० टक्के सिंथेटिक ट्रॅकचे काम झाले आहे.
१० धावणपथ, २४ क्रीडा प्रकार खेळण्याची सोय
या मैदानावर ॲथलेटिक्स खेळातील २४ क्रीडा प्रकार खेळण्याची सोय असणार आहे. तसेच चार फूट रुंदींचे एकूण १० धावणपथ या मैदानावर असणार आहे. लांब उडी व तिहेरी उडीसाठीदेखील दर्जेदार दोन मैदाने तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी गुजरात येथून समुद्रातील वाळू मागविण्यात येणार आहे. तसेच थाळीफेक व हातोडाफेकची मैदाने ही जाळीने बंदिस्त असणार आहेत.
इटलीवरून मागवले स्प्रिंकलर्स
उल्लेखनीय बाब म्हणजे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. या मैदानावर ११० मी. बाय ७३ मी. लांबीचे नॅचरल गवत लावण्यात आले आहे. त्यासाठी इटलीवरून स्प्रिंकलर्स मागवण्यात आले असून २१ मिनिटांत पूर्ण मैदान पाण्याने ओले होणार आहे. या माध्यमातून गवताची निगा व देखभाल होणार आहे.
ऑलिम्पिक दर्जाचा होणार ट्रॅक
पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्या कंपनीने ट्रॅक बनवला होता त्याच कंपनीचे साहित्य वापरून सदरचा सिंथेटिक ट्रॅक बनविला जाणार आहे. या ट्रॅकसाठी क्रीडा विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख, प्रशिक्षक सुरेंद्र मोदी परिश्रम घेत आहेत.
दर्जेदार खेळाडूंची खाण
छत्रपती संभाजीनगरात दर्जेदार खेळाडूंची खाण आहे. ११० व ६० मीटर हर्डल्समध्ये दोन राष्ट्रीय विक्रम स्वत:च्या नावावर असणारा तसेच याच वर्षी जूनमध्ये तैवान ॲथलेटिक्स स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देणारा तेजस शिरसे, गतवर्षी आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी साक्षी चव्हाण, जागतिक शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी राशी जाखेटे, क्रीडाप्रबोधिनीचा वेगवान धावपटू ऋषीप्रसाद देसाई यांच्यासारखे अनेक दर्जेदार खेळाडू मराठवाड्यात घडले आहेत. मात्र, सिंथेटिक ट्रॅकची सुविधा नसल्यामुळे तेजस शिरसे व साक्षी चव्हाणला मुंबईला जावे लागले तर राशी जाखेटे हिला खेळ सोडावा लागला. आता विद्यापीठ आणि विभागीय क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅक होणार असल्यामुळे शहर सोडून जाण्याची वेळ प्रतिभावान खेळाडूंवर येणार नाही, असा विश्वास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.