अनामत रकमेवर व्याज देण्याचे आदेश
By Admin | Updated: January 21, 2015 01:07 IST2015-01-21T01:01:16+5:302015-01-21T01:07:48+5:30
वाशी : लिलावात घेतलेला गाळा ताब्यात देईपर्यंत भरलेल्या बोलीच्या रक्कमेवर वाशी ग्रामपंचायतीने गाळेधारकाला १३ टक्के व्याज देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचने दिले़

अनामत रकमेवर व्याज देण्याचे आदेश
वाशी : लिलावात घेतलेला गाळा ताब्यात देईपर्यंत भरलेल्या बोलीच्या रक्कमेवर वाशी ग्रामपंचायतीने गाळेधारकाला १३ टक्के व्याज देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचने दिले़ दरम्यान, या आदेशाविरूध्द विभागीय ग्राहक मंचात दाद मागणार असल्याचे उपसरपंच नागनाथ नाईकवाडी यांनी सांगितले़
वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या राजीव गांधी व्यापारी संकुलाच्या लिलावादरम्यान येथील प्रकाश दत्तात्रय पत्की यांनी भाग घेऊन ११८ नंबरचा गाळा चार लाख ३१ हजार रूपयांची बोली लावून घेतला होता़ बोली लावलेली रक्कम सात दिवसात भरण्याची अट असल्याने पत्की यांनी तत्काळ रक्कम भरणा केली होती़ त्यावेळी ग्रामपंचायतीने जुलै २०१० च्या ग्रामसभेत ठराव घेवून गाळे गाळेधारकांना देण्यात येत नाहीत, तोपर्यंत १३ टक्के व्याज देण्याचा ठराव घेतला होता़ मात्र, एक-दोन महिन्यानंतर ग्रामपांयतीच्या निवडणुका झाल्याने सत्तांतर झाले़ व्यापारी संकुल उभारण्यास ४२ महिन्यांचा कालावधी गेला़ सत्तांतरानंतर नवीन कार्यकारिणीने जुलै १०१२ च्या ग्रामसभेत गाळेधारकांना १३ टक्के व्याज देण्याचा ठराव रद्द केला़ त्यामुळे पत्की यांनी गाळा मिळत नसल्याने व व्याजही मिळत नसल्याने जिल्हा ग्राहक मंचात दाद मागितली़
जिल्हा ग्राहक मंचातील सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून वाशी ग्रामपंचायतीने गाळेधारकास रक्कम भरल्यापासून गाळा ताब्यात देईपर्यंत १३ टक्के दराने व्याज द्यावे, असे आदेश दिले़ हे आदेश जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष एम़व्हीक़ुलकर्णी, सदस्या विद्युलता दलभंजन, सदस्य मुकुंद सस्ते यांनी दिला़ (वार्ताहर)