इंटरचेंजचे काम पूर्णत्वाकडे; लवकरच डीएमआयसी आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:19 IST2025-04-29T12:18:47+5:302025-04-29T12:19:52+5:30

डीएमआयसीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्याेगिक पट्ट्यांना जोडणारा नवीन रिंग रोडही आता लवकरच होणार आहे.

Interchange work nearing completion; Road connecting DMIC and Samruddhi Highway to be opened soon | इंटरचेंजचे काम पूर्णत्वाकडे; लवकरच डीएमआयसी आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा मार्ग खुला

इंटरचेंजचे काम पूर्णत्वाकडे; लवकरच डीएमआयसी आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा मार्ग खुला

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीच्या डीएमआयसी, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना थेट समृद्धी महामार्गाची दारे उघडणाऱ्या जयपूर येथील इंटरचेंजचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होईल आणि डीएमआयसीच्या समृद्धीचा मार्ग खुला होणार असल्याचे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑरिक सिटीअंतर्गत असलेल्या डीएमआयसी शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात टोयटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, अथर एनर्जी, पिरॅमल फार्मा या मोठ्या कंपन्यांनी उद्योग उभारण्याची घोषणा केली आहे. ऑरिक सिटीमध्ये मागील वर्षभरात ५४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा कंपन्यांनी केली आहे. यासोबतच अन्य लहान आणि मध्यम कंपन्यांकडूनही डीएमआयसीमध्ये उद्योग उभारणीसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. डीएमआयसीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्याेगिक पट्ट्यांना जोडणारा नवीन रिंग रोडही आता लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून येथील सीएमआयए आणि मसिआसह अन्य औद्योगिक संघटनांकडून ऑरिकला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी केली जात होती.

यानंतर दोन वर्षांपूर्वी जयपूर येथे इंटरचेंज उभारून ऑरिकमधील रस्त्याला कनेक्टिव्हिटी देण्याच्या कामाला सुरुवात झाली. ऑरिक ते समृद्धी महामार्ग असा सुमारे एक किलोमीटर रस्ता नव्याने तयार करण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. शेतकऱ्यांना आतापर्यंतचा सर्वाधिक मोबदलाही शासनाकडून देण्यात आला. हा रस्ता तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. शिवाय, समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक तो टोल प्लाझा उभारण्याचे काम करण्यात आले. यामुळे ऑरिक सिटीच्या समृद्धीचा महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीकरिता केवळ औपचारिक उद्घाटन बाकी आहे.

कामावर ४१ कोटींचा खर्च
ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी इंटरचेंज उभारणे, एक किलाेमीटर रस्ता तयार करणे, यासह अन्य कामांसाठी ऑरिक सिटीने तब्बल ४१ कोटी रुपयांचा ठेका संबंधित एजन्सीला दिला होता. हे काम आता पूर्णत्वाकडे असून, अवघ्या महिनाभरात हा रस्ता जनतेसाठी खुला होणार आहे.

वाहतूक कोंडी टळेल
सध्या सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना तसेच शेंद्रा पंचतारांकित आणि ऑरिक सिटीतील वाहनधारकांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी एक तर हर्सूल सावंगी येथील इंटरचेंजवर जावे लागते किंवा करोडीजवळील दुसऱ्या इंटरचेंजचा वापर करावा लागतो. हा प्रवेश करताना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. आता मात्र त्यांना ऑरिक शेंद्रामधून थेट जयपूर येथील इंटरचेंजवरून समृद्धीवर प्रवेश मिळेल.

Web Title: Interchange work nearing completion; Road connecting DMIC and Samruddhi Highway to be opened soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.