जात-धर्मवादापेक्षा भापने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढावा; अंबादास दानवेंचा टोला
By बापू सोळुंके | Updated: November 4, 2025 19:01 IST2025-11-04T18:54:37+5:302025-11-04T19:01:11+5:30
आता भाजपने निवडणूक आयोगाविरोधात स्वतंत्र मोर्चा काढावा, दानवे यांचा आशीष शेलारांना खोचक सल्ला

जात-धर्मवादापेक्षा भापने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढावा; अंबादास दानवेंचा टोला
छत्रपती संभाजीनगर: भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दुबार मतदारांची नावे वाचून दाखविली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही सदोष मतदार याद्यांविरोधात मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चात भाजप सहभागी झाला नाही, तरी काही हरकत नाही. आता त्यांनी जातीवाद आणि धर्मवाद करण्यापेक्षा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढावा, असा टोला माजी विरोधीपक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी येथे मंगळवारी (दि.४) पत्रकार परिषदेत भाजपला लगावला.
दानवे म्हणाले की, भाजपने 'जस्टीस फॉर ऑल' असे म्हटले आहे. या भूमिकेचे आम्ही स्वागतच करतो. मतदार याद्यांतील दुबार मतदारांची नावे वगळून यादी दोषमुक्त करावी, अशी आमची मागणी आहे. भाजपने यात जातीयवाद, धर्मवाद आणू नये. मुंबईतील आमच्या मोर्चात आले नाही, तरी काही हरकत नाही. पण आता भाजपने निवडणूक आयोगाविरोधात स्वतंत्र मोर्चा काढावा, अशी विनंती आपण शेलार यांना करीत असल्याचे दानवे म्हणाले. ठाकरे यांच्या उद्यापासूनच्या मराठवाडा दौऱ्याशी आचारसंहितेचा संबंध नसल्याचे दानवे यांनी सांगितले.
आर्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यासोबत अधिकाऱ्यांची चौकशीची गरज
रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणांत पोलिसांनी आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची चौकशी करणार आहे. याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, आर्याने शिक्षण विभागात चांगले काम केले, त्याचा मोबदला देण्यात आला नाही. यात आता शिक्षणमंत्र्यासोबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे, असे दानवे म्हणाले.