विद्यापीठामागे लागणार चौकशीचा ससेमिरा
By Admin | Updated: August 30, 2016 01:17 IST2016-08-30T01:11:12+5:302016-08-30T01:17:22+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील मागील काही वर्षांत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता असून, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तसे सूचित केले आहे.

विद्यापीठामागे लागणार चौकशीचा ससेमिरा
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मागील काही वर्षांत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता असून, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी तसे सूचित केले आहे. राज्यमंत्री वायकर हे १ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत येणार होते. तसा दौराही आला होता. या दौऱ्यात ते विद्यापीठातील गैरव्यवहारासंदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या विषयाच्या अनुषंगाने कुलगुरू, कुलसचिव आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा करणार होते. सोमवारी सायंकाळी वायकर यांचे शहरात आगमन झाले. त्यानंतर ते परभणीच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, विद्यापीठाच्या महिला वसतिगृहासंदर्भात काही तक्रारी आहेत. त्या तक्रारींसंदर्भातही आपण विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. १ सप्टेंबर रोजीची बैठक रद्द झाल्याने विद्यापीठावरील संकट तूर्तास टळले आहे. मात्र, आपण लवकरच विद्यापीठात येऊन तक्रारींसंदर्भात बैठक घेणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. यामुळे आगामी काळात वायकर हे विद्यापीठाला केव्हाही भेट देणार असून, विद्यापीठाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. घोटाळ्यांची मोठी जंत्रीच; कारवाई मात्र शून्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आॅगस्ट २०१५ मध्ये सुमारे २५ लाख रुपये खर्च करून केलेला विदेश दौरा चांगलाच गाजला होता. विदेश दौऱ्यावर गेलेल्या तत्कालीन व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून रक्कम वसूल करण्याचे कुलगुरूंनी जाहीर केले होते. मात्र ही रक्कम वसूल करण्यात आली नाही. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी विद्यापीठाकडून घेतलेले मोबाईल आणि लॅपटॉप परत दिलेच नाहीत. काही अधिकारी आणि प्राध्यापक ते घरी नेऊन वापरत आहेत. यासंदर्भातही वसुली करण्याचा निर्णय होऊनही पुढे काहीच हालचाल झाली नाही. विद्यापीठात अनेक विभागांत बेकायदेशीरपणे आणि मुदत संपल्यावरही अनेक प्राध्यापक काम करीत आहेत. त्यांना वेतनवाढही मिळत आहे. याशिवाय रोजंदारीतील ठराविक कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे विद्यापीठाच्या सेवेत घेण्याचाही प्रकार झाला आहे. सहा कोटी रुपयांचा सॉफ्टवेअर खरेदी घोटाळाही विद्यापीठात गाजला.