औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:02 IST2018-03-10T13:53:48+5:302018-03-10T14:02:43+5:30
समर्थ नगर येथील वीर सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने शाईफेक केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यानंतर पोलीस व नागरिकांनी पुतळ्याची स्वच्छता केली.

औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्यावर शाईफेक
औरंगाबाद : समर्थ नगर येथील वीर सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने शाईफेक केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यानंतर पोलीस व नागरिकांनी पुतळ्याची स्वच्छता केली. या दरम्यान अनुयायांनी घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले.
देशभरातील पुतळा विटंबनेचे लोन आता औरंगाबादपर्यंत आले असून समर्थ नगर येथील वीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर अज्ञाताने शाईफेक केल्याची घटना सकाळी ६. ३० दरम्यान उघडकीस आली. ही बाब लक्षात येताच पोलीस व नागरिकांनी पुतळा परिसराकडे धाव घेतली. यानंतर नागरिकांनी व पोलिसांनी पुतळ्याची साफसफाई केली.
दरम्यान, या घटनेचा निषेध करत समर्थनगर येथे सावरकर अनुयायांनी रस्ता रोको केला. यामुळे समर्थ नगर भागातील वाहतूक काही काळ ठप्प होती. यानंतर आंदोलकांनी उपायुक्त विनायक ढाकणे यांना या प्रकरणाची चौकशी करून कठोर शासन करावे असे निवेदन देण्यात आले. यासोबतच पोलिस प्रशासनाने यावर त्वरीत कार्यवाही करून दोषींना अटक करावी अन्यथा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.