ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार

By बापू सोळुंके | Published: July 17, 2023 08:51 PM2023-07-17T20:51:11+5:302023-07-17T20:51:33+5:30

शेंद्रा ऑरिक सिटीतील ऑरिक हॉलला सोलार सिस्टीमद्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Industries in Auric will get electricity at a cheaper rate of 10 to 20 percent | ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार

ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाउनशिपला अर्थात ऑरिक सिटीला वीज वितरणचा परवाना सहा महिन्यांपूर्वी प्राप्त झाला आहे. एकीकडे ऑरिकने विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदीसाठी बोलणी सुरू केली, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग (एमईआरसी)कडे वीज दराचा प्रस्ताव सादर केला आहे. ऑरिकमधील उद्योग, व्यावसायिक आणि रहिवाशांना महावितरणपेक्षा १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ऑरिक सिटीमधील उद्योजकांना स्वस्त, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण वीज देण्याचा निर्णय ऑरिक प्रशासनाने घेतला आहे. ऑरिकच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत शेंद्रा आणि बिडकिन औद्योगिक पट्ट्यातील ग्राहकांना आता महावितरण नव्हे तर ऑरिक सिटीच्या वतीने वीजपुरवठा होणार आहे. यासाठी एमईआरसीने ऑरिकला सहा महिन्यांपूर्वीच परवाना दिला आहे. ऑरिक सिटीकडूनही वीज उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांकडून वीज खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. ऑरिकसाठी सध्या २५ मेगा वॅट विजेची गरज आहे.  याकरिता आता स्वतंत्र दोन वेगवेगळे फीडर कार्यान्वित केले आहेत. सौर वीज, हायड्रो अथवा पवन ऊर्जा आणि कोळशापासून तयार केली जाणारी वीज अशा वेगवेगळ्या वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत वीज खरेदीसंदर्भात ऑरिक प्रशासनाचे बोलणे सुरू आहे. शिवाय, वीजदर ठरविण्यासाठी एमईआरसीकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्यातील विजेच्या दरापेक्षा ही वीज सुमारे १० ते २० टक्के स्वस्त दरात असेल, असा दावा ऑरिकच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

ऑरिक हॉलला सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा
शेंद्रा ऑरिक सिटीतील ऑरिक हॉलला सोलार सिस्टीमद्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. साडेतीन ते चार वर्षांत वीजबिलापोटी अपेक्षित खर्चाची यातून बचत होईल. 00 .90 मेगावॉटचा हा प्रकल्प असणार आहे, अशी माहिती ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Industries in Auric will get electricity at a cheaper rate of 10 to 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.