अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, छत्रपती संभाजीनगरात पर्यटक वाढणार कसे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:30 IST2025-07-08T19:30:09+5:302025-07-08T19:30:45+5:30
राष्ट्रीय परिषदेतून टुरिस्ट गाइड फेडरेशन वेधणार सरकारचे लक्ष

अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, छत्रपती संभाजीनगरात पर्यटक वाढणार कसे ?
छत्रपती संभाजीनगर : पर्यटननगरीछत्रपती संभाजीनगरात १९ वर्षांनंतर टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाची ९ ते ११ जुलैदरम्यान २६ वी राष्ट्रीय परिषद होत आहे. अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, टुरिस्ट गाइडची कमतरता यांसह पर्यटकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे या परिषदेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.
पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात रोज देश-विदेशातील पर्यटक दाखल होतात. परंतु, या पर्यटकांना पर्यटननगरी दाखविणार कोण, असा प्रश्न टूर व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४३ गाइड आहेत. मात्र, प्रत्यक्षात अवघे २० ते २७ जण पर्यटकांना सेवा देत असल्याची परिस्थिती आहे. गाइडची संख्या वाढण्यासाठी विशेष प्रशिक्षण बॅचेस सुरू होतील, परदेशी भाषांचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष डाॅ. सुभाष जाधव यांनी सांगितले.
विमानसेवेची कनेक्टिव्हिटी वाढावी
छत्रपती संभाजीनगरातून देशांतर्गत विमानसेवा वाढावी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी केली जाणार आहे. बौद्ध देशांना प्राधान्याने विमानसेवा सुरू करण्याकडे लक्ष वेधले जाईल.
जयपूर-उदयपूर विमानसेवा
जयपूर-उदयपूरसाठी पुन्हा विमानसेवा सुरू झाली पाहिजे. यातून पर्यटननगरीत देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढीस हातभार लागेल, असे सांगण्यात आले.
अजिंठा रोड जलदगतीने पूर्ण करा
अजिंठा रोडची जागोजागी दुरवस्था आहे. पर्यटकांना त्याचा त्रास होतो. या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडिया या अधिवेशनातून करणार आहे.
सरकारकडे याही मागण्या
- दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविणे.
- पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करणे.
- अजिंठा-वेरुळदरम्यान शटल सेवा सुरू करणे.
- अजिंठा लेणी येथे पर्यटकांची तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी खिडक्यांची संख्या वाढविणे.
- उच्च-मूल्याच्या तिकिटधारकांसाठी प्राथमिकता प्रवेश व्यवस्था लागू करणे.