सहा दशकांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने...
By विकास राऊत | Updated: April 20, 2023 15:43 IST2023-04-20T15:42:46+5:302023-04-20T15:43:45+5:30
सहा जनगणना : औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढला

सहा दशकांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने...
छत्रपती संभाजीनगर : भारत जगात लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आला असून, जिल्ह्यातील लोकसंख्या वृध्दीचाही त्यात खारीचा वाटा आहे. सहा दशकांत जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने चालली आहे. १९९० च्या दशकातील औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढत गेला आहे. १९६१ ते २०११ पर्यंत सहावेळा जनगणना झाली असून, सातवी जनगणना झाल्यानंतर जिल्हा निश्चितपणे ४० लाखांची पायरी ओलांडेल. १९५१ साली १० लाखांच्या आसपास जिल्ह्याची लाेकसंख्या होती. जालना जिल्ह्याची निर्मिती १९८१ साली झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या आकड्यात बदल झाले. १९९१ ते २०११ पर्यंतच्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या वृध्दीचा दर वाढत गेला.
जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुका असलेला जालना १ मे १९८१ रोजी जिल्हा म्हणून स्थापित झाला. छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत असलेले जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुक्यांसह परभणीतील दोन तालुके मिळून हा जिल्हा झाल्यानंतर लोकसंख्येचे विभाजन झाले.
जनगणना वर्ष------लोकसंख्या
१९६१------------ग्रामीण---१३ लाख १५ हजार ६३०
शहरी----२ लाख १६ हजार ७११
एकूण --१५ लाख ३२ हजार ३४२
१९७१------------ग्रामीण--१० लाख २४ हजार ८६२
शहरी----३ लाख ७६ हजार ७१२
एकूण--१४ लाख १ हजार ५७४
१९८१------------ग्रामीण--११ लाख ८१ हजार ७६६
शहरी----३ लाख ९४ हजार ३७८
एकूण--१५ लाख ८१ हजार ७६६
१९९१------------ग्रामीण--१४ लाख ८८ हजार ६३६
शहरी----७ लाख २५ हजार १४३
एकूण--२२ लाख १३ हजार ७७९
२००१------------ग्रामीण--१८ लाख ९ हजार ८६३
शहरी----१० लाख ८७ हजार १५०
एकूण---२८ लाख ९७ हजार १३
२०११------------ग्रामीण--२० लाख ८१ हजार ११२
शहरी----१६ लाख २० हजार १७०
एकूण--३७ लाख १ हजार २८२
१ लाख ४७ हजार ६५६ महिलांची संख्या कमी----
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सध्या ३७ लाख १ हजार २८२ इतकी आहे. यात १९ लाख २४ हजार ४६९ पुरुष, तर १७ लाख ७६ हजार ८१३ महिलांची संख्या आहे. एकूण लोकसंख्येत १ लाख ४७ हजार ६५६ महिलांची संख्या कमी आहे.
१९७१ सालानंतर नागरीकरण वाढले...
१९७१ सालानंतर नागरीकरण वाढले. शहराची लाेकसंख्या ७८.८३ टक्क्यांनी वाढली. १९८१ ला ते प्रमाण घटून ५ टक्क्यांवर आले. त्यानंतर १९९१ साली ८३ टक्क्यांनी शहरी लोकसंख्या वाढली. २००१ व २०११ सालच्या जनगणनेत ४९ टक्क्यांची वाढ शहरी लाेकसंख्येत असल्याचे आढळून आले. दशवार्षिक लाेकसंख्या वाढीचा दर २७.७६ टक्के राहिला आहे.
राज्याच्या लोकसंख्येत ३.२ टक्के वाटा..
जिल्ह्याच्या लोकसंख्येचा राज्याच्या लोकसंख्येत ३.२ टक्के वाटा आहे. राज्य लोकसंख्या घनतेचा दर प्रती चौरस कि.मी.३६५ व्यक्ती असून, जिल्ह्याची लोकसंख्या घनता प्रती चौ.कि.मी.मागे ३६६ व्यक्ती प्रमाणात आहे. ७९.२ टक्के जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण आहे.