शेतरस्त्यांची ‘वाट’ बिकट; कामांना गती मिळेना, १४७१ पैक्की आतापर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण
By विजय सरवदे | Updated: July 22, 2023 16:16 IST2023-07-22T16:15:15+5:302023-07-22T16:16:06+5:30
यंदाही शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

शेतरस्त्यांची ‘वाट’ बिकट; कामांना गती मिळेना, १४७१ पैक्की आतापर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : अपुरा निधी तसेच मजुरांकडून कामांची मागणी होत नसल्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची ‘वाट’ बिकट झाली आहे. यंदा प्रशासकीय मान्यता मिळालेल्या १४७१ कामांपैकी आजपर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण होऊ शकली. आता पावसाचे दिवस असल्यामुळे पर्यायाने या रस्त्यांची कामे थांबवावी लागणार आहेत. परिणामी, यंदाही शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजनेसाठी जिल्ह्यात यंदा २ हजार ४३६ पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली. यापैकी आतापर्यंत १४७१ रस्ते कामांना तांत्रिक, प्रशासकीय मान्यता मिळाली. विशेष म्हणजे, या कामांसाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. त्यानंतरही सुमारे ९०० कामे अद्याप लटकलेली आहेत.
या कामांसाठी अवघा २८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दुसरीकडे, रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात या कामांची गती मंदावली. आतापर्यंत अख्खा उन्हाळा गेला, तरी अवघे ३६.५ किलोमीटर लांबीच्या ३१ रस्त्यांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली आहेत. उर्वरित सुरू झालेल्या ५४१ कामांपैकी किती रस्ते पावसाळ्यात होतील, याचे उत्तर प्रशासकीय यंत्रणेकडेही नाही.
पाणंद रस्ते म्हणजे काय?
शेतशिवारात जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यांना ‘पाणंद’ म्हणतात. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्त्याची गरज आहे. त्यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतरस्ता किंवा पाणंद रस्ता आवश्यक असतो. अनेकदा पावसामुळे हे रस्ते वाहून जातात. त्यामुळे शेतापर्यंत ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रसामग्री नेणे, तयार झालेला शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे कठीण जाते, हे लक्षात घेऊन शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याची योजना अमलात आणली आहे.
रस्ते कामांवर संपाचा परिणाम
मध्यंतरीच्या काळात गटविकास अधिकारी तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या संपामुळे जिल्ह्यात १४७१ कामांना कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही ९०० कामे रखडली आहेत. अलीकडे मजुरांकडूनही कामांसाठी मागणी नाही. या सर्व अडचणींवर मात करत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सध्या ५७२ कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील.
- अनुपमा नंदनवनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो)