छत्रपती संभाजीनगरात पोलिसांना गुन्हेगारी आवरेना; सलग दुसऱ्या दिवशी लुटमारीच्या घटना

By सुमित डोळे | Updated: March 1, 2025 19:10 IST2025-03-01T19:05:40+5:302025-03-01T19:10:57+5:30

छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारीत लुटमारीच्या ३० पेक्षा अधिक घटना

In Chhatrapati Sambhaji Nagar, police do not control crime; Robbery, ransom demand for the second day in a row | छत्रपती संभाजीनगरात पोलिसांना गुन्हेगारी आवरेना; सलग दुसऱ्या दिवशी लुटमारीच्या घटना

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांना गुन्हेगारी आवरेना; सलग दुसऱ्या दिवशी लुटमारीच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सामान्यांना राजरोस शस्त्रांचा धाक दाखवून, मारहाण करून लुटले जात असताना पोलिसही गुंडगिरी, गुन्हेगारी थांबवण्यात अपयशी ठरत आहेत. गेल्या २४ तासांत सुतगिरणी चौकात एका फळ विक्रेत्याला लुटण्यात आले तर अदालत रोडवरील ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला सहा जणांच्या टोळीने थेट खंडणीची मागणी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

घटना १ : अल्पवयीन मुलाकडून चाकू हल्ला
दोन दिवसांपूर्वी इंदिरानगरमध्ये पैशांसाठी तरुणाचा गळा कापण्यात आला. जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीतच पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता सुतगिरणी चौकात फळविक्रेते रामेश्वर कोरडे (४१, रा. उल्कानगरी) यांना दोघांना लुटले. सागर मिसाळ (२०, रा. देवळाई चौक) व एका गजानननगरच्या अल्पवयीन मुलाने त्यांना पैशांची मागणी केली. त्यांनी नकार देताच अल्पवयीन मुलाने चाकू काढून भिरकावला. सागरने त्यांच्या खिशातील ४ हजार रोख, मोबाइल काढून पळ काढला. कोरडे यांच्या मुलाने पाठलाग करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी दगड फेकून जखमी केले. अल्पवयीन मुलगा पकडला गेल्याने सागरचे नाव निष्पन्न झाले.

घटना २ : खंडणीसाठी मारहाण
विनय ढाकेंच्या (३५) रॉयल चिंतामणी टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसायाचे अदालत रोडवर कार्यालय आहे. २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता सिल्लेखान्याच्या जाकिर कुरेशीने कार्यालयात जात पैशांची मागणी केली. ढाके यांनी नकार दिला. जाकिर थोड्या वेळाने शस्त्रधारी गुंडांसह गेला. ‘हमारे इलाके में रेहकर धंदा करता है और हमको दारुको पैसे नहीं देता’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सहकाऱ्याचा मोबाइल फोडला. पुन्हा कार्यालय उघडल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिली.

घटना ३ : तरुणाला लुटले
रोहन भालेराव (२१) हा २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता मावस भावासोबत भाजी खरेदीसाठी जाधववाडीत गेला होता. तेव्हा आरोपी कुणाल जाधव, गौरव ऊर्फ बग्या व अन्य एकाने त्यांच्यावर हल्ला चढवला. चाकूने वार करून खिशातून ५ हजार रोख, मोबाइल हिसकावून निघून गेले. स्थानिकांकडून त्यांच्या घराची माहिती मिळतच भालेराव यांनी त्याचे घर गाठले. तेव्हा कुणालच्या आईने त्यांनाच धमकावत अंगावर धावून गेली. शिवाय, कुणालला पळवून लावले. पंधरा दिवसांपूर्वीच याच कुणालने एका व्यावसायिकाला लुटले होते. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना अटक केल्याचे सहायक निरीक्षक नितीन कामे यांनी सांगितले.

गतवर्षीचा रेकॉर्ड यंदाही कायम
गतवर्षी लुटमारीच्या १९४ तर घरफोडीच्या १४८ घटना घडल्या होत्या. यंदा जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये लुटमार, शस्त्रांचा धाक दाखवून किमान ५५ नागरिकांना लुटण्यात आले. यात केवळ पुंडलिकनगर व एमआयडीसी सिडको पोलिसांनी शोध घेत टोळ्यांना अटक केली. उर्वरित गुन्हे शाखा, पोलिस ठाणे सपशेल अपयशी ठरले आहे.

Web Title: In Chhatrapati Sambhaji Nagar, police do not control crime; Robbery, ransom demand for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.