छत्रपती संभाजीनगरातील पैठण रोड नव्हे, तर 'स्ट्रेस रोड'; लोखंडी पुलावर रोजचीच कोंडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:52 IST2025-10-31T17:52:03+5:302025-10-31T17:52:56+5:30
सध्या या पुलावरून रोज २० हजारांहून अधिक वाहने धावतात. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगरातील पैठण रोड नव्हे, तर 'स्ट्रेस रोड'; लोखंडी पुलावर रोजचीच कोंडी!
छत्रपती संभाजीनगर: मुंबई, पुणे, अहिल्यानगर, धुळे आणि वाळूज उद्योगनगरीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला व किमान शतकभरापूर्वी छावणीतील खाम नदीवर बांधलेला लोखंडी पूल आता खूपच अरूंद ठरत असल्याने तेथे रोज ट्रॅफिक जाम होत आहे. परंतु, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या निधीवर त्याचे रुंदीकरण अवलंबून आहे.
मध्यंतरी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार त्या पुलाचे मजबुतीकरण, रुंदीकरण गरजेचे आहे. शहर व वाळूज उद्योगनगरी, छावणी, पडेगाव, मिटमिट्यासह शहरातील पूर्वेकडील सर्व वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यावर असलेला हा पूल वाढत्या वाहतुकीसाठी अरुंद ठरला आहे. सध्या या पुलावरून रोज २० हजारांहून अधिक वाहने धावतात. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. नगरनाका ते महावीर चौक या मुख्य रस्त्यावर ब्रिटिशांनी छावणीतील लोखंडी पुलाची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते.
छावणीतील लष्कराला बीड तसेच अन्य भागात जाण्यासाठी हा पूल बांधला गेला. या पुलाने शंभरी पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन छावणी परिषद पदाधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पूल हस्तांतरित केला. सध्या बांधकाम विभागाकडे या पुलाची देखभाल व दुरुस्ती आहे. मध्यंतरी पालिकेने पुलावर व्हर्टिकल लोखंडी जाळ्या लावल्या.
शहरातील रस्ते विकासाबद्दल १६ ऑक्टोबर रोजी 'स्मार्ट सिटी' कार्यालयात पेडको या संस्थेने सादरीकरण केले. या सादरीकरणात शहरात नव्याने १२ उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्गासह महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची शिफारस केली आहे. बांधकाम विभागदेखील भविष्यातील अनुदान व कुंभमेळ्यानिमित्त मिळणाऱ्या निधीवरच या पुलाच्या रूंदीकरणासह डागडुजीचा विचार करत आहे.
प्रस्ताव तयार
या पुलावरील खड्यांची डागडुजी मध्यंतरी केली. सध्या पुलाच्या रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाकडे काहीही प्रस्ताव नाही. महापालिकेने यासाठी प्रस्ताव तयार केला.
- एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग