छत्रपती संभाजीनगरात संतप्त उपोषणकर्त्यांनी मंडप पेटवून केला आत्मदहनाचा प्रयत्न
By बापू सोळुंके | Updated: September 11, 2023 14:40 IST2023-09-11T14:40:37+5:302023-09-11T14:40:57+5:30
यावेळी झालेल्या धरपकडमध्ये एका कार्यकर्त्याचा हात भाजला.

छत्रपती संभाजीनगरात संतप्त उपोषणकर्त्यांनी मंडप पेटवून केला आत्मदहनाचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर: पिसादेवी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी मंडप पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धरपकडमध्ये एका कार्यकर्त्याचा हात भाजला.
पिसादेवी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीन दिवसापासून भारत कदम ,पंढरीनाथ गोडसे पाटील आणि अमित जाधव हे उपोषण करीत आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून उपोषण करीत आहेत. त्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासह गावकऱ्यावर लाठीहल्ला केला होता.या घटनेत शेकडो मराठा बांधव गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे.
जरांगे यांनी आज पासून अन्नपाणी आणि औषधोपचार सोडले. यामुळे त्यांची प्रकृती दिवसान दिवस खालवत आहेत. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन दिवसापासून पिसादेवी येथे उपोषण सुरू आहे .या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने संतप्त उपोषणकर्त्यांनी सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता .याप्रमाणे सोमवारी दुपारी या उपोषणकर्त्यांनी अचानक त्यांचा मंडप पेटवून त्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित मराठा सेवक आणि पोलिसांनी त्यांना पकडले.या वेळी झालेल्या धरपकड पंढरीनाथ गोडसे यांचा एक हात भाजला.