Video: दारूड्याने भररस्त्यात चाकूच्या धाकावर बसची चावी पळवली; अर्धा तास वाहतूक ठप्प
By सुमित डोळे | Updated: August 12, 2023 19:40 IST2023-08-12T19:38:53+5:302023-08-12T19:40:11+5:30
एका तरुणाने गाडी आडवी उभी करून बस अडवत चाकू काढला

Video: दारूड्याने भररस्त्यात चाकूच्या धाकावर बसची चावी पळवली; अर्धा तास वाहतूक ठप्प
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीच्या बससमोर गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवत एका मद्यपीने बसची चावीच पळवली. टीव्ही सेंटर चाैकात बस ऐन वर्दळीच्या वेळी बंद पडल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दुसरी चावी पोहोचवल्यानंतर बस निघाली व खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली.
स्मार्ट बसचे चालक किसन विठ्ठल चव्हाण हे औरंगपुरा ते सिडको या मार्गावरील बसवर कामावर होते. टीव्ही सेंटर चौकात जाधववाडीकडे जाणाऱ्या दिशेेला बस जात असताना अचानक एका तरुणाने गाडी आडवी उभी करून बस अडवली. थेट चालकाचे दार उघडून चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीची चावी घेऊन पळून गेला. काही क्षणात हा प्रकार घडल्याने चव्हाणही चक्रावून गेले. रस्त्यावरच बस थांबल्याने वाहतूक खोळंबली. सिडको, हर्सूल पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अखेर अर्ध्या तासाने डेपोहून दुसरी चावी आल्यावर वाहतूक सुरळीत झाली.