उत्तरांसह प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात ! 'बाटू'च्या अभियांत्रिकी परीक्षेतील प्रकार

By राम शिनगारे | Updated: July 18, 2023 17:19 IST2023-07-18T17:19:22+5:302023-07-18T17:19:54+5:30

बाटू विद्यापीठाला संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी.ई.-बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्सच्या तिसऱ्या वर्षांतील सहाव्या सत्राची परीक्षा होती.

in 'BATU' Engineering Exam Question paper with answers in hands of students! | उत्तरांसह प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात ! 'बाटू'च्या अभियांत्रिकी परीक्षेतील प्रकार

उत्तरांसह प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात ! 'बाटू'च्या अभियांत्रिकी परीक्षेतील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत बी.ई, बी.टेक.च्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सहाव्या सत्राच्या प्रश्नपत्रिका चक्क उत्तरांसह विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. हा प्रकार विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने तत्काळ दुसरी प्रश्नपत्रिका पाठवली. त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती बाटू विद्यापीठातर्फे देण्यात आली.

बाटू विद्यापीठाला संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी.ई.-बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्सच्या तिसऱ्या वर्षांतील सहाव्या सत्राची परीक्षा होती. हा ‘इलेक्टिव्ह’चा पेपर असल्याने विद्यार्थीसंख्या कमी होती. मात्र शहरातील देवगिरी अभियांत्रिकी, श्रीयश अभियांत्रिकी, एमआयटी (बी.टेक.) आणि हायटेक इंजिनिअरिंग या चार केंद्रांवर परीक्षा झाली. दुपारी ३ ते ५दरम्यान पेपर होता. बाटूच्या परीक्षा विभागाने ऑनलाइन पाठविलेल्या पेपरला सर्व केंद्रांनी डाऊनलोड केले. त्यानंतर त्याच्या छायाप्रती काढून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. पण केंद्रप्रमुख, परीक्षा कक्षातील पर्यवेक्षकांच्या लक्षात ही बाब आली नाही. त्यांनी झेरॉक्स काढलेल्या प्रश्नपत्रिका वितरित केल्या. विद्यार्थी उत्तरे लिहीत असताना त्यांच्या लक्षात आले की, प्रश्नपत्रिकेवरच उत्तरे देण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आणून दिल्यानंतर विद्यापीठाला कळविण्यात आले. त्यानंतर तत्काळ प्रश्नपत्रिका नव्याने पाठविण्यात आली.

परीक्षा विभागाकडून तत्काळ दुरुस्ती
घडलेला प्रकार परीक्षा संचालकांनी निदर्शनास आणून दिला. पाठविलेल्या प्रश्नपत्रिकेवर सर्वच प्रश्नांची उत्तरे नव्हती. फक्त एकाच प्रश्नाचे ‘मॉडेल अन्सर’ होते. हा प्रकार समजताच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून जमा केल्या. त्यानंतर दुसरी प्रश्नपत्रिका पाठवून निर्धारित वेळेतच परीक्षा पार पाडली.
- डॉ. के. व्ही. काळे, कुलगुरू, बाटू विद्यापीठ, लोणेरे, (जि. रायगड)

Web Title: in 'BATU' Engineering Exam Question paper with answers in hands of students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.