आंबेडकरनगरात झोपड्यांच्या झाल्या माड्या अन् मुले चढताहेत प्रगतीच्या शिड्या !
By साहेबराव हिवराळे | Updated: July 1, 2023 20:43 IST2023-07-01T20:42:31+5:302023-07-01T20:43:54+5:30
एक दिवस एक वसाहत: मुले बनली उपजिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, पोलिस, उद्योजक

आंबेडकरनगरात झोपड्यांच्या झाल्या माड्या अन् मुले चढताहेत प्रगतीच्या शिड्या !
छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडच्या पूर्वेला सिडको एन-७ लगत उभारलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरातील युवक-युवतींनी शिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात केली असून, गवंड्याच्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. तसेच, बहुतांश युवक-युवती पोलिस, नर्स, अधिकारी बनले आणि उद्योजकही तयार होत आहेत. आंबेडकरनगरातील झोपड्यांच्या माड्या झाल्या असून, मुले आता प्रगतीच्या शिड्या चढत आहेत, असे अभिमानाने पालक सांगतात.
शिक्षणाच्या माध्यमातून युवक आता बँकेत, मॉल्समध्ये नोकऱ्या करतात आणि मार्केटिंगही करताना दिसतात. रिकामे राहण्यापेक्षा अनेकांनी व्यावसायिकतेचे धडे घेतले आहेत. बाजूलाच जाधववाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत मालवाहतूक करण्यासाठी रिक्षा, मेटॅडोअरची संख्याही येथे बऱ्यापैकी असल्याने आर्थिक स्रोत मिळाले आहेत. त्यामुळे रिकामे फिरणाऱ्यांना पालकही आता पोसायला तयार नाहीत. कारण महागाईच्या काळात कुटुंब चालवायचे म्हणजे हाताला काम हवेच, अशीच भावना बनली आहे.
अपेक्षा उंचावल्या ...
आंबेडकरनगरचे पहिले नगरसेवक महादेव सूर्यवंशी होते. त्यानंतर गौतम लांडगे, शकुंतला इंगळे, कचरू सोनवणे, रामदास बोरडे, भारती सोनवणे अशा लोकप्रतिनिधींचे वॉर्डासाठी योगदान राहिले. सामाजिक बांधीलकी ठेवत घरकुल योजना, शासनाच्या योजनांतून रोजगार वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वाचनालय, सामाजिक सभागृह अशा योजना राबविल्या आहेत. आंबेडकरनगर, फुलेनगर, गौतमनगरचा परिसर विकासाच्या दिशेने आहे. स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीसाठी युवक- युवती प्रयत्नशील आहेत. खेळावरही लक्ष केंद्रित केले आहे. आत्मविश्वास वाढीस लागल्याचा फायदाच झाला आहे.
- माजी नगरसेवक गौतम लांडगे
मेहनतीने नाव केलं
शिक्षणाचे धडे देण्यावर भर प्रत्येक कुटुंबातील मुलांना शाळेत आणण्याची मोठी जबाबदारी पार पाडली, त्याच काळात त्यांना विविध क्षेत्रांत तुम्ही तुमचे नाव व करिअर कसे करू शकता, हे सातत्याने बिंबविल्याने युवकांनी मेहनतीने आंबेडकरनगरचे नाव चमकविले आहे. ही वाटचाल आता अशीच पुढे सुरू राहणार आहे.
- प्रकाश सोनवणे (मुख्याध्यापक)
उद्योग उभा करता आला
व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेऊन आता वाळूजसारख्या ठिकाणी प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय सुरू करता आला. झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतले. शिक्षणात ही ताकद आहे.
- आनंद घोरपडे, उद्योजक
रोजगार मेळावे घेण्यात यावेत
शासकीय रोजगाराच्या संधी देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना देखील तंत्रज्ञान देण्यासाठी पालकांचा अट्टाहास असतो. रोजगार मेळावे घेण्यात यावेत.
- चक्रधर मगरे (सामजिक कार्यकर्ता)