विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात आजपासून प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:50 IST2025-06-05T14:43:37+5:302025-06-05T14:50:02+5:30

यंदाही प्रवेशासाठी ‘सीईटी’ होणार नसून, पदवीच्या गुणवत्तेवरच सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.

Important for students; University admission process from today, online registration required | विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात आजपासून प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी गरजेची

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात आजपासून प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी गरजेची

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ते ३० जूनच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. यंदाही प्रवेशासाठी ‘सीईटी’ होणार नसून, पदवीच्या गुणवत्तेवरच सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.

कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसर येथील प्रवेशासाठी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. प्रकुलगुरू डॉ.वाल्मीक सरवदे यांच्यासह प्रवेश समितीच्या सदस्यांनी वेळापत्रक तयार केले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी २००, तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. ५ ते ३० जून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंर नोंदणीची माहिती १ जुलै रोजी विभागांकडे सुपुर्द करण्यात येईल. त्यानंतर, विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत संबंधित विभागांत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. १४ जुलै रोजी कागदपत्रांची छाननी पूर्ण होईल. १७ जुलै रोजी सर्व सामान्य गुणवत्ता यादी जाहीर होईल. आक्षेपासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, सुधारित गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर, २२ जुलै रोजी निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैच्या दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

२ हजारांवर जागा उपलब्ध
विद्यापीठाच्या एकूण ५१ पैकी विद्यापीठ परिसरात ४३ विभागांत पदव्युत्तरच्या एकूण ५४ अभ्यासक्रमासाठी २ हजार २२८ प्रवेश क्षमता आहे. त्याशिवाय या वर्षी काही नवीन अभ्यासक्रम मंजूर झाले, तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र असे ६० अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती उपकुलसचिव माधव वागतकर यांनी दिली आहे.

Web Title: Important for students; University admission process from today, online registration required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.