छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्वाचे; पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:07 IST2025-05-17T12:05:51+5:302025-05-17T12:07:11+5:30
या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती छावणी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्वाचे; पाच महिन्यांसाठी मकाई गेट वाहतुकीसाठी बंद
छत्रपती संभाजीनगर : मकाई गेटच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी १८ मे ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मकाई गेट दरवाजा ते टाऊन हॉलकडे जाणारा अंतर्गत रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पुरातत्त्व विभागाकडून राज्य संरक्षित स्मारक असलेल्या मकाई गेटच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या कामासाठी शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. दुरुस्तीच्या काळात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बेगमपुरा चौक- मकाई गेट दरवाजा मार्गे टाऊन हॉलकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती छावणी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली.
पर्यायी मार्ग असेल असा
-बीबी का मकबऱ्याकडे जाणारी सर्व वाहने मिल कॉर्नर, मिलिंद चौक, विद्यापीठ गेट, बेगमपुरा चौक मार्गे पुढे जातील व येतील.
-तसेच, ज्युबिली पार्क मार्गे पाणचक्की गेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, बेगमपुरा चौक मार्गेही वाहतूक वळवण्यात येईल.