'कॅट लव्हर्स'साठी महत्वाचे; तुमच्या मनीमाऊची महापालिकेत नोंदणी करणे बंधनकारक
By मुजीब देवणीकर | Updated: May 29, 2023 13:00 IST2023-05-29T12:59:20+5:302023-05-29T13:00:53+5:30
पाळीव प्राण्यांना उपचाराची गरज असेल तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची घरपोच मोबाईल व्हॅनही येणार

'कॅट लव्हर्स'साठी महत्वाचे; तुमच्या मनीमाऊची महापालिकेत नोंदणी करणे बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर : शहरात श्वान, मांजरप्रेमींची संख्या झपाट्याने वाढते आहे. विदेशातील विविध प्रजातींचे श्वान शहरात आणले जात आहेत. परशीयन मांजरींची क्रेझही शहरवासीयात वाढू लागली. त्यामुळे आता मांजरीचीही मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. प्राण्यांवर औषधोपचार करण्यासाठी महापालिकेची मोबाईल व्हॅन तूमच्या घरी येईल, त्यासाठी ठरावीक शुल्क नागरिकांकडून वसूल केले जातील, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून श्वान परवाना देण्यात येतो. ७५० पेक्षा अधिक नागरिकांनी श्वान परवाना घेतला. मात्र, नूतणीकरणासाठी अत्यल्प नागरिक येतात. दरवर्षी परवाना नूतणीकरण करणे बंधनकारक आहे. मनपाच्या मध्यवर्ती जकात नाका येथील प्राण्यांच्या रुग्णालयात नागरिक पाळीव प्राणी घेऊन येतात. त्यांच्यावर मनपाकडून उपचारही केले जातात. शहरात श्वानप्रेमी आणि मांजरप्रेमींची संख्या झपाट्याने वाढू लागली. प्राण्यांना रेबीजसह अन्य इंजेक्शन द्यावे लागतात. बहुतांश नागरिक आपल्या घरातील सदस्याप्रमाणे पाळीव प्राण्यांना जीव लावतात. त्यांना किंचितही त्रास होऊ लागला तर खासगी डॉक्टर, मनपा रुग्णालय, खडकेश्वर येथील शासकीय दवाखान्यात घेऊन जातात.
प्राणीप्रेमींची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना विविध सोयी सुविधा देण्याचा विचारही मनपा प्रशासनाने सुरू केला असून, त्याचाच एक भाग म्हणून एक मोबाईल व्हॅन तैनात केली जाणार आहे. नागरिकांनी मोबाईल केल्यानंतर दारावर व्हॅन येईल. तूमच्या लाडक्या प्राण्यावर औषधोपचार करून निघून जाईल. त्यासाठी ठराविक रक्कम वसूल केली जाईल, अशी माहिती जी. श्रीकांत यांनी दिली. राज्यातील काही महापालिका घरातील कोणत्याही पाळीव प्राण्याची नोंद करतात. त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मनपाही मांजरींची नोंदणी करणार आहे. लवकरच यासंदर्भातील तपशील जाहीर केला जाणार आहे.
श्वान परवाना तपशील
नवीन नोंदणी- ७५० रुपये
नूतनीकरण (३१मे)- ५०० रुपये
नूतनीकरण (३१ मे नंतर) - ७५० रुपये
श्वान पकडून आणला तर दंड - ७५० रुपये
२०२२-२३ मधील नोंदणी
नवीन परवाना- १९४
नूतनीकरण- १४२