देखाव्यांमधून दर्शविले पाण्याचे महत्त्व

By Admin | Updated: April 16, 2016 01:41 IST2016-04-16T01:32:46+5:302016-04-16T01:41:00+5:30

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री परभणी शहरातून विविध जयंती मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांनी महत्त्व

The importance of water shown through the scenes | देखाव्यांमधून दर्शविले पाण्याचे महत्त्व

देखाव्यांमधून दर्शविले पाण्याचे महत्त्व


परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री परभणी शहरातून विविध जयंती मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांनी महत्त्व विषद केलेल्या नदीजोड प्रकल्प व पाण्याचे महत्त्व यावर देखावे सादर करण्यात आले. विशेषत: सम्राट मित्र मंडळाचा देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सायंकाळी ५ वाजेपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून आलेल्या मिरवणुका शिवाजी चौकात एकत्र येऊन तेथून गुजरी बाजार, क्रांतीचौक, स्टेशनरोड मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दाखल होत होत्या. येथे दाखल झाल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान विविध जयंती मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. सम्राट मित्र मंडळाने दुष्काळाच्या प्रश्नावर उत्कृष्ट देखावा सादर केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नदीजोड प्रकल्पाचे सांगितलेले महत्त्व या संदर्भातील संकल्पना या जयंती मंडळाने सादर केली. वेगवेगळ्या नद्यांची जोडणी केल्यानंतर त्यांचे वाहणारे पाणी व त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असा देखावा या मंडळाचा होता. हडको येथील अजिंठानगर जयंती मंडळानेही दुष्काळ व नदीजोड प्रकल्प ही संकल्पना मांडून देखावा सादर केला. रविराज पार्क, पार्वतीनगर व सुयोग कॉलनी या संयुक्त जयंती मंडळाने ‘जल है तो कल है’, ही संकल्पना सादर केली. त्यामध्ये २०१६ ची दुष्काळी परिस्थिती व पाण्याची बचत केल्यानंतर २०१७ मध्ये दिसणारे निसर्गाचे हिरवेगार चित्र हे देखाव्यातून सादर करण्यात आले. तसेच देशातील संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ असल्याचाही देखावा राहुलनगर येथील जयंती मंडळाने सादर केला. ‘९ कोटींचा राजा’ हा आकर्षक देखावा नवजीवन कॉलनी भागातील जयंती मंडळाने सादर केला. रघुदास सोसायटी मंडळाने राजसिंहासनावर विराजमान झालेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर असा देखावा सादर केला. पंचशीलनगर येथील जयंती मंडळाने संसद भवनाचा देखावा सादर केल होता. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, भारतीय बौद्ध महासभा, विष्णू नवले पाटील मित्र मंडळ, संबोधी मित्र मंडळ, मनपा यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शहरातील मिरवणुकींचा समारोप मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The importance of water shown through the scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.