छत्रपती संभाजीनगर : 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी) उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधी देण्याची परवानगी देण्यात आली. परंतु होमिओपॅथी डाॅक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विरोध दर्शविला आहे.
‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना भेटणार‘ एफडीए’ने एक पत्र काढून होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिलेली आहे; परंतु जे डॉक्टर फक्त एक वर्षाचा कोर्स करून जर ॲलोपॅथीचे उपचार रुग्णांना देत असतील तर व्यवस्थित उपचार न मिळाल्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले किंवा ‘कंझ्युमर प्रोटेक्शन’ मध्ये होणाऱ्या कायदेशीर कारवाईत नक्कीच जास्त भर पडेल. डाॅक्टर-रुग्णांच्या नात्यात जास्त दुरावा होईल. हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये आहे व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने यासाठी होमिओपॅथीच्या डॉक्टरांना रजिस्ट्रेशनसाठी परवानगी दिलेली नाही. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना कायद्याची, कोर्टाची परमिशन नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनचे शिष्टमंडळ ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.- डाॅ. उज्ज्वला दहिफळे, अध्यक्ष, ‘आयएमए’, छत्रपती संभाजीनगर शाखा
दिशाभूल, संभ्रम निर्माण करताहेत'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी) कोर्स सुरू होऊन ८ वर्षे झाली आहेत. या कालावधीत अनेक होमिओपॅथिक डॉक्टरांनी ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमातील विषयांचा समावेश असलेले हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याला विरोध करणे अनुचित आहे. कारण शिक्षण घेणे हे प्रत्येक नागरिकाचा नैतिक अधिकार आहे. न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी, होमिओपॅथीक डाॅक्टरांनी शिक्षण घेतले आहे आणि परिपत्रक जारी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विरोध केवळ संभ्रम निर्माण करणारा आहे. ‘आयएमए’ हे २०१४ पासून विरोध करत आहे. कायद्याने जे शक्य आहे, ते आम्ही मागितले. ॲलोपॅथी औषधी देणे आम्ही सुरू केले आहे.- डॉ. प्रकाश झांबड, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी तथा अध्यक्ष ‘हिम्पम’