छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 20:04 IST2025-04-29T20:04:15+5:302025-04-29T20:04:37+5:30
परशुरामाची १५ फुट उंचीची आणि सुमारे २ क्विंटल वजनाची भव्य मूर्ती दौलताबाद रोडवरील दत्त मंदिर परिसरात

छत्रपती संभाजीनगरात परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा!
छत्रपती संभाजीनगर : भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामाचे भव्य रूप पाहायचे असेल, तर थेट दौलताबाद रोड गाठा ! येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात २०१९ मध्ये उभारलेली ही जिल्ह्यातील पहिली भव्य मूर्ती भक्तांचे आकर्षण ठरत आहे.
यंदाच्या परशुराम जयंतीनिमित्त (मंगळवारी) ही मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहे. नव्या पिढीला भगवान परशुरामांचे शौर्य, पराक्रम आणि मानवतेसाठीचे कार्य माहीत व्हावे, यासाठीच या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती.
१५ फूट उंचीची भव्य मूर्ती
पिळदार, बलदंड शरीरयष्टी असलेली ही तेजस्वी मूर्ती १५ फूट उंच आहे आणि सुमारे २ क्विंटल वजनाची आहे. उजव्या हातात परशू आणि डाव्या हातात धनुष्य धारण केलेले परशुराम युद्धासाठी सज्ज असल्याचे भासते. पदमपुऱ्यातील प्रसिद्ध मूर्तिकार सुंदरलाल कुमावत यांनी ही मूर्ती तयार केली आहे.
कोणी घेतला पुढाकार?
अ. भा. ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक, शंतनू चौधरी आणि मिलिंद पिंपळे यांनी २०१९ मध्ये या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याच वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या दिवशी विधिवत पूजा व आरती करून ही भव्य मूर्ती माधव पाठक यांच्या दत्त मंदिराबाहेर उभारण्यात आली.
हडको येथे भव्य मंदिराची उभारणी
हडको, एन-१२ परिसरातील विवेकानंदनगर येथे प्रभू श्रीराम आणि भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. खा. भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास विभागामार्फत मंजूर कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच १९ एप्रिल रोजी पार पडला. खा. संदीपान भुमरे आणि आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते या मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पासाठी तब्बल ४० लाखांचा निधी मंजूर झाला असून, एक वर्षाच्या आत मंदिर उभे राहणार आहे.
परशुरामाचे पहिले मंदिर विवेकानंदनगरात
विवेकानंद नगरातील मंदिरात भगवान परशुरामांची अडीच फूट उंचीची संगमरवरी मूर्ती जयपूरहून आणली आहे. याचबरोबर, दौलताबाद रोडवरील विद्यमान १५ फूट उंचीची भव्य मूर्तीही नवीन मंदिरात मुख्य दर्शनी भागात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. हे भगवान परशुरामांचे मंदिर जिल्ह्यातील पहिले मंदिर ठरले.
- सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष, अ. भा. ब्राह्मण महासंघ