मराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्तापालट करणे सहज शक्य: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:46 IST2024-10-14T16:43:08+5:302024-10-14T16:46:48+5:30
मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली

मराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्तापालट करणे सहज शक्य: मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर : मराठा, दलित आणि मुस्लीम या तीन शक्ती एकत्र आल्यास राज्याची सत्तापालट करणे सहज शक्य आहे. हे तीनही समाज एकत्र येऊ नयेत, म्हणून सत्ताधारी मंडळी आपल्यातच झुंज लावत आहे, ही खेळी ओळखा व मनापासून एकत्र येण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मराठा आक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाली.
त्याप्रसंगी जरांगे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसचा ‘डीएनए’ ओळखणे अवघड आहे. सकाळी ते हिंदुत्ववादी असतात, दुपारी ते बहुजवादी असतात आणि सायंकाळी ते पुरोगामी असतात. रंग बदलणाऱ्या अशा माणसापासून सावध राहिले पाहिजे. राज्यात मराठा, दलित आणि मुस्लीम या तीनच शक्ती निर्णायक आहेत. हे तिघेजण संघटित झाले पाहिजेत. वरवर एकत्र येऊन चालणार नाही, तर मनापासून प्रक्रिया घडली पाहिजे. मग, काहीही अशक्य नाही. लक्षात ठेवा, एकटा कोणताही समाज स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यासाठी या तीन शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैव असे की, सत्ताधारी मंडळी या तिघांंना एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात सतत भांडणे लावून एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आपण ओळखले पाहिजे.
यावेळी ऊर्जाभूमीचे संकल्पक चेतन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ऊर्जाभूमीच्या माध्यमातून शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आणण्याचा परिवर्तनाचा हा विचार राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जाईल. मी ध्येयवेडा कार्यकर्ता आहे. मी उद्या कदाचित नसेलही. पण, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीचा विचार थांबणार नाही. आमच्या समाजाला आजपर्यंत अनेकांनी फक्त स्वार्थापायी वापरून घेतले. त्यामुळे यापुढील काळात भीमशक्तीला सोबत घेऊन आपण राज्यात परिवर्तनाचे नवे पर्व सुरू करावे, याकडे चेतन कांबळे यांनी जरांगे पाटलांचे लक्ष वेधले.
यावेळी डॉ. प्रतिभा आहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला चेतन कांबळे यांनी क्रांतीची मशाल जरांगे पाटलांच्या हाती देऊन बाबासाहेबांची मूर्ती भेट दिली. व्यासपीठावर प्रा. सुनील मगरे, रखमाजी जाधव, चंद्रकांत भराड, विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांची उपस्थित होती.