पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या
By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2024 19:00 IST2024-07-04T18:59:38+5:302024-07-04T19:00:04+5:30
एक दिवस एक वसाहत: ना पिण्याचे पाणी मिळते, ना पथदिवे असतात चालू

पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या
छत्रपती संभाजीनगर : बायपासला खेटून असलेल्या मधुमालतीनगरातील नागरिकांना पाऊस पडला की, दुचाकी घरापासून दूरवर ठेवूनच घर गाठावे लागते. इतकी दलदल या भागात असते.
या भागात पाणीटंचाई असल्यामुळे सध्या वापरासाठी खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागते, तर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जलकुंभाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप नळाला पाणी आलेले नाही. पाणीपुरवठा कधी होईल, हे आजघडीला सांगणे कठीण आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने बायपास रस्त्यावर पाणी देवळाई चौकातून मधुमालतीनगरात वाहून येते. त्यावेळी परिसरातील घरे जणूकाही बेटावर उभारली आहेत की काय, असा भास होतो. रिकामे प्लॉट पावसाच्या पाण्याचे तळे बनतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या अंगणात आढळतात. कर भरूनही सुविधा देण्यास मनपाकडून कोणतीही हालचाल केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
एनए ४७ बी, आता गुंठेवारी, असे नवनवीन फंडे आणले जात असून, सुविधा देण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. पावसाळा आला की, चार महिने घर सोडून शहरात राहण्यास जाण्याची अनेक नागरिकांची इच्छा होते. मुलांना शाळेत घेऊन जाणे किंवा स्वत: दुचाकी घरापर्यंत नेणे म्हणजे कसरत वाटते.
-योगेश दहीवाल, रहिवासी
रस्ता मंजूर होणार केव्हा?
ड्रेनेजलाइन टाकण्यात आली; परंतु रस्त्याच्या कामाला मुहूर्त का मिळेना; असा प्रश्न भेडसावत आहे.
-धनंजय पुरी, रहिवासी
घंटागाडी आणि औषध फवारणीचे काय?
घंटागाडी रोज न येण्यामुळे कचरा पडून राहतो. पावसाळ्यात रस्त्यावर आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागतो. औषध फवारणी किमान आठवड्यातून एकदा करावी.
-दीपक शर्मा, रहिवासी