२३ लाख ८८ हजार मतदारांकडे ओळखपत्रे

By Admin | Updated: September 22, 2014 01:19 IST2014-09-22T00:04:26+5:302014-09-22T01:19:26+5:30

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत.

Identity cards to 23 lakh 88 thousand voters | २३ लाख ८८ हजार मतदारांकडे ओळखपत्रे

२३ लाख ८८ हजार मतदारांकडे ओळखपत्रे

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २४ लाख ४४ हजार मतदारांपैकी २३ लाख ८८ मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत.
जिल्ह्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९९.८५ टक्केमतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. तर पैठण मतदारसंघात सर्वात कमी ९६ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत एकूण २४,४४,१९७ मतदार आहेत. यापैकी २३,८८,८१८ जणांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. निवडणूक आयोगातर्फे मागील महिनाभरात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नोंदणी मोहिमेंतर्गत ३० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या सर्वांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली असून, त्यांनाही लवकरच घरपोच मतदार ओळखपत्रे वाटप केली जाणार आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७७ हजार मतदारांपैकी २ लाख ७२ हजार मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. फुलंब्री मतदारसंघातही ९८.३३ टक्के मतदारांना ओळखपत्रे मिळाली आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २ लाख ७५ हजार मतदारांपैकी २ लाख ७४ हजार मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ९६.६४ टक्के, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ९७.२४ टक्के तसेच पैठण मतदारसंघात ९७.६० टक्के, गंगापूर मतदारसंघात ९६.७० टक्के आणि वैजापूर मतदारसंघात ९६.९५ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत.
मतदारांसाठी हेल्पलाईन तक्रार निवारण कक्ष
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात मतदारांसाठी हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता भंगविषयक व निवडणूक खर्चविषयक तक्रार असल्यास नागरिकांना ती हेल्पलाईनवर नोंदविता येणार आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००२३३९२३४ असा असून, सदरचा कक्ष निवडणूक काळात २४ तास सुरू राहणार आहे. एम. ए. सय्यद हे या कक्षाचे नोडल आॅफिसर आहेत. तसेच एस. टी. पोफळे, एस. के. काशीद, राहुल राऊत, एम. टी. शेख, दीपक देशमुख इत्यादी कर्मचाऱ्यांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी
विधानसभा निवडणूक चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी घेतले जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतील मतदान प्रक्रियेसाठी तब्बल १६ हजार कर्मचारी लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात येत असून, त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी, दुसरे ९ आॅक्टोबर आणि तिसरे १४ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल. तसेच मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक ११ आणि १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.
व्हॉटस्अपवर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्याला अटक
औरंगाबाद : महायुतीच्या नेत्यांबाबत व्हॉटस्अपवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी एका आरोपीला अटक केली. व्हॉटस्अपच्या एका ग्रुपवर काल एका तरुणाने महायुतीच्या नेत्यांबाबत बदनामीकारक मजकूर टाकला. ही बाब लक्षात येताच राजेंद्र साबळे यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविल्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी तो मजकूर टाकणाऱ्या तरुणाचा मोबाईल क्रमांकावरून शोध घेतला.

Web Title: Identity cards to 23 lakh 88 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.