'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 20:12 IST2025-01-13T20:11:43+5:302025-01-13T20:12:34+5:30

'मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली.'

'I will not contest assembly elections anymore', MLA Abdul Sattar announces | 'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा

'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा

श्यामकुमार पुरे, सिल्लोड: राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. अंभई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सत्तार म्हणाले की, 'मी आमदार-मंत्री असताना १८-१८ तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला, मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली व माझा विजय २४२० मतांनी झाला. लोकांना विकास नकोय, जाती पातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील. मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही,' अशी घोषणा त्यांनी केली आहे. 

सत्तार पुढे म्हणतात, 'मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली, लोकांना विकास नकोय, तर जाती पातीवर निवडणुका हव्यात. आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील, मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली, सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा विकास केला, सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, एमआयडिसी आणली. शेतकरी बागायतदार व्हावा, यासाठी पूर्णा नदीवर बेरिजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी घेतली.'

सत्तारांचा मुलगा निवडणूक लढवणार?
'आमदार व मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीच कामे न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मतदान मिळते. विरोधक जाती पातीवर निवडणूक लढवतात, हे राजकारण घातक आहे. जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जाती पातीवर निवडणुका होत असेल, तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्यांचे आभार, पण मी आता यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितले की, मी निवडणूक लढणार नाही, तुला लढायची असेल, तर बघ नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र,' अशी घोषणा अब्दुल सत्तारांनी केली. त्यांच्या या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Web Title: 'I will not contest assembly elections anymore', MLA Abdul Sattar announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.