मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:45 IST2024-12-23T19:45:16+5:302024-12-23T19:45:29+5:30

सामाजिक न्याय विभागातील आव्हाने पेलण्यासाठी काम करणार आहे. कोणतेही खाते लहान अथवा मोठे नसते. 

I will be the Guardian Minister; Action will be taken against hooliganism and land mafia in the district: Sanjay Shirsat | मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट

मीच होणार पालकमंत्री; जिल्ह्यातील गुंडगिरी, भूमाफियांवर कारवाई करणार: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार आहे. शहर आणि जिल्ह्यात वाढत चाललेली गुंडगिरी, भूखंड माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार. मग, तो कोणीही असो. कोणत्याही पक्षाचा असो, त्याला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी इशारा दिला.

मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिरसाट हे शनिवारी शहरात दाखल झाले. शहरवासीयांनी रॅली काढून त्यांचे जंगी स्वागत केले. रविवारी दुपारी संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी टाकली. सामाजिक न्याय विभागातील आव्हाने पेलण्यासाठी काम करणार आहे. कोणतेही खाते लहान अथवा मोठे नसते. 

कोणालाही सोडले जाणार नाही
जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार असल्याचा दावा मंत्री शिरसाट यांनी केला. शहर आणि जिल्ह्यातील अवैध धंदे, गुंडगिरी आणि भूमाफियावर नियंत्रण मिळवून येथील उद्योग, व्यवसायासाठी चांगले वातावरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सिल्लोड येथील गुंडगिरी संपविणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, सिल्लोड असो किंवा अन्य कुठेही दुसऱ्याची जमीन हडपणे हा गुन्हाच आहे. कितीही जुने प्रकरण असो महिनाभरात या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही, मग तो कोणीही असो नमूद करीत त्यांनी माजी मंत्री सत्तार यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला.

‘डीपीसी’च्या निधीचे फेरनियोजन
जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे असमान वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. तुमच्याच पक्षाच्या माजी पालकमंत्र्यांनी केलेल्या निधी वाटपाचे फेर नियोजन करणार का, या प्रश्नावर मंत्री सिरसाट म्हणाले, कोणीही असो, सरकारी पैशाचा गैरवापर किंवा उधळपट्टी करू शकत नाही. चुकीच्या पद्धतीने निधीचे वाटप केले असेल, तर त्याचे नक्कीच फेरनियोजन होईल. याबाबतचा अहवाल तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री शिरसाट म्हणाले.

Web Title: I will be the Guardian Minister; Action will be taken against hooliganism and land mafia in the district: Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.