भावाच्या खुनात मलाच फसवणार होते; मृत विकास बनसोडेच्या भावाने सांगितली थरारक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:18 IST2025-03-18T20:18:17+5:302025-03-18T20:18:39+5:30
सरकार न्याय द्या, भावाला मारणाऱ्या आरोपींना फासावर चढवा; मयत विकास बनसोडेच्या भावाची मागणी

भावाच्या खुनात मलाच फसवणार होते; मृत विकास बनसोडेच्या भावाने सांगितली थरारक कहाणी
छत्रपती संभाजीनगर : ‘माझ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा,’ अशी भावना प्रेमसंबंधाच्या संशयावरून आष्टी तालुक्यात डांबून केलेल्या मारहाणीतील मयत विकास बनसोडे या तरुणाच्या भावाने व्यक्त केली. विकासचे सोमवारी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शरीरावर अनेक ठिकाणी झालेल्या मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव व शाॅकमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.
विकासचे पार्थिव रविवारी रात्री शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले. सोमवारी सकाळी १०:३० वाजता शवविच्छेदनाला सुरुवात झाली. दोन तास शवविच्छेदन चालले. घाटीत मयत विकासचा भाऊ आकाश बनसोडे याच्यासह नातेवाईक उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना आकाश म्हणाला, विकाससोबत दोन-तीन दिवसांपासून बोलणे झाले नव्हते. थेट त्याच्या मृत्यूचीच माहिती मिळाली. त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व १० आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याने केली.
मामा म्हणायचो, त्यांनीच...
आकाश बनसोडे म्हणाला, माझे आई-वडील हे ऊस तोडीसाठी जायचे. त्यातूनच भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याशी ओळख निर्माण झाली. आधी मीही त्यांच्याकडे कामाला होतो. त्यांना आम्ही मामा म्हणत होतो. परंतु त्यांनीच भावासोबत असे केले.
भावाच्या खुनात मलाच फसवणार होते
भावाच्या खुनात मलाच फसविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. भावानेच भावाला मारले, असे दाखविण्याचा डाव होता, असेही आकाश बनसोडे म्हणाला. दरम्यान, नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस अधीक्षक डाॅ. अनिता जमादार यांनी घाटीत आकाश बनसोडे याची भेट घेत संवाद साधला.