पतीचा खून झालाय, किराणा भरायला पैसे नाहीत, पोट कसे भरू? उपोषणार्थीचा प्रश्न
By स. सो. खंडाळकर | Updated: August 5, 2025 19:39 IST2025-08-05T19:38:41+5:302025-08-05T19:39:00+5:30
न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही

पतीचा खून झालाय, किराणा भरायला पैसे नाहीत, पोट कसे भरू? उपोषणार्थीचा प्रश्न
छत्रपती संभाजीनगर : किराणा भरायला पैसे नाहीत. ३ मुले आहेत. त्यांना शाळेत घालू शकत नाही. नवऱ्याला कारण नसताना मारून टाकलं. मी उघड्यावर पडले आहे. आता मरायची वेळ आली. ८ दिवस या बहिणीकडे, कधी त्या बहिणीकडे रहावं लागतं, ही व्यथा आहे सुजाता दांडगे यांची.
अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनच्या वतीने त्या सोमवारपासृून उपोषणाला बसल्या आहेत. लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या, आत्ताच चक्कर येत आहे. मला बीपीचा त्रास आहे. दुपारी गोळ्या घेतल्या. माझे पती एका कंपनीत काम करून २५ हजार रुपये कमावत होते. त्यातूनच आमचे घर चालत होते. त्यांचा हर्षनगर मनपा शाळेजवळ निर्घृण खून करण्यात आला. खून करणारा मुख्य आरोपी ८ दिवसात तुरुंगातून सुटला. काही आरोपी तुरुंगात आहेत.
मुलांना शाळेत कसे पाठवू?
आज खायला मोताद आहे. मोठा मुलगा गौरव हा ११ वर्षांचा आहे. मुलगी स्तुती ८ वर्षांची आहे. या दोघांनाही मी शाळेत घालू शकलेली नाही. कारण शाळेत प्रवेश घेण्यापुरतेही पैसे नाहीत. छोटा मुलगा यश चार वर्षांचा आहे. या सर्वांचे भवितव्य आज अंध:कारमय झालेले आहे.
अशा आहेत मागण्या......
सुजाता दांडगे व अमोल गायकवाड यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्या अशा :
१) फाजलपुरा येथील मनपा शाळेच्या पडक्या इमारतीत रेकी करून व दबा धरून बसलेल्या गुंडांनी रणजीत सुधाकर दांडगे या तरुणाची निर्घृण हत्या केली. त्याच्या पीडित पत्नीस मनपा सेवेत सामावून घ्यावे व आर्थिक मदत करण्यात यावी.
२) सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील मलबा पडून मृत्यू पावलेल्या रेखा गायकवाड यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस मनपा सेवेत सामावून घ्यावे व आर्थिक मदत करण्यात यावी
७ महिन्यांचा समरही उपोषणात...
राजू भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर चांदणे, सुभाष पाचुंदे, जॉन आव्हाड, रितेश डोके, अक्षय भालेराव, रोहित भालेराव, विलास सौदागर, सुरेश नाडे, योगेश नाडे, रंजना साळवे, उत्तम नाडे, संदीप चांदणे, रंजिता भालेराव आदी या उपोषणात सहभागी झालेले आहेत. सुजाता रणजित दांडगे व तिची दोन लहान मुले, अमोल हरिभाऊ गायकवाड तसेच राजू भालेराव यांचा ७ महिन्यांचा नातू समर भालेराव देखील उपोषणामध्ये सहभागी आहे.