छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थीना प्रश्नांची उत्तरे पुरवली. त्यानुसार अनेक विद्यार्थी एकाच बाकड्यावर बसून सामूहिक उत्तरे लिहीत होते. माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांचे पथक केंद्रावर पोहचल्यानंतर त्यांना एकसारखी उत्तरे असणारे ९ कागद सापडले. त्यानुसार सर्वच वर्गातील सीसीटीव्हींची तापसणी केल्यानंतर हा धक्कादायक गैरप्रकार समोर आला. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांसह दक्षता समितीच्या आदेशानुसार केंद्रातील १९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यासह निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाची परीक्षा होती. कन्नडमधील जैतापूरच्या राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा केंद्रातील एकूण १४ वर्गात ३३४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील ३२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. वर्गांमध्ये मंडळाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसविलेले आहेत. सीसीटीव्हीच्या निगराणीत परीक्षा सुरू असतानाच शिक्षणाधिकारी लाठकर, विस्तार अधिकारी सीताराम पवार यांचे पथक केंद्रावर पोहचले. त्याठिकाणी तपासणीदरम्यान पथकाला ९ कागद सापडले. त्यावर एकसारखीच उत्तरे होती. तेव्हा लाठकर यांना सामूहिक कॉपीचा संशय आल्याने त्यांनी केंद्र संचालकास सीसीटीव्हीची तपासणीचे आदेश दिले. तपासणीत अनेक वर्गांमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीचे कागद देताना आढळले. त्याशिवाय विद्यार्थी एकमेकांच्या बेंचवर उठून बसत कॉपी करत असल्याचेही दिसले. त्यानुसार लाठकर यांनी दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांना हा प्रकार कळविला. त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला.
१९ जणांचे हाेणार निलंबनपरीक्षा केंद्रावर एकूण १९ शिक्षक व कर्मचारी नियुक्त होते. त्यात बैठ्या पथकासह इतरांचा समावेश आहे. १९ पैकी दोन शिक्षक जिल्हा परिषदेचे असून, त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय सीईओंनी घेतला आहे. त्याचवेळी इतर १७ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश संबंधित संस्थाचालकाला देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली.
कन्नड ठाण्यात गुन्हा दाखलजैतापूर परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामध्ये सहभागी असलेल्या १९ कर्मचाऱ्यांच्या विरोधात कन्नड ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश कन्नडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
केंद्रातील संपूर्ण कर्मचारी बदललेपरीक्षा केंद्रात नियुक्त १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केलेली असतानाच त्याठिकाणी संपूर्ण कर्मचारीच नव्याने देण्यात आले आहेत. पुढील सर्व परीक्षा अत्यंत शिस्तीत व नियमानुसार पार पडाव्यात, यासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सामूहिक कॉपीचा अहवाल मंडळाकडेपरीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीसारखाच प्रकार सुरू होता. त्यामुळे केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. त्या उत्तरपत्रिकांची विशेष तपासणी करण्यासाठी विभागीय मंडळांकडे पाठविल्या जाणार आहेत. त्याविषयीचा अहवाल तयार केला असून, बुधवारी विभागीय मंडळाला सुपूर्द केला जाईल. त्यानंतरच सामूहिक कॉपी झाली की नाही, हे उत्तरपत्रिकांच्या तपासणीतून स्पष्ट होईल.- अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग
Web Summary : Teachers aided mass copying during 12th grade exams in Chhatrapati Sambhajinagar. Officials found similar answers, prompting CCTV review. Nineteen staff face suspension and police charges. All student answer sheets were seized.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में 12वीं की परीक्षा में शिक्षकों ने सामूहिक नकल करवाई। अधिकारियों को समान उत्तर मिले, जिसके बाद सीसीटीवी की समीक्षा की गई। उन्नीस कर्मचारियों पर निलंबन और पुलिस आरोप। सभी छात्रों की उत्तर पुस्तिकाएं जब्त।